आगरदांडा आरोग्य केंद्र ‌‘सलाईन’ वर

रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांराच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाईनवर आहे. केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील शेकडो नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या केंद्राला अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना आरोग्य सेवा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या आरोग्य केंद्राच्याप्रति शासन गंभीर असले तरी प्रशासन मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे काही रुग्ण केंद्रातील रुग्णालयात न जाता मुरुड येथील खासगी रुग्णालयात जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन उपचार करतात. तरी या गंभीर विषयाकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देऊन आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.

सध्या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नेमणूक असली तरी या ठिकाणी एकच डॉक्टर उज्जवलदीप बाबुरडे हे काम पाहात आहेत. तर, दुसरे डॉक्टर डेपोटेशन प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे अलिबाग या ठिकाणी काम करतात. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टरची कमतरता भासत आहे. तरी, आगरदांडा आरोग्य केंद्राकरिता एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करावी तसेच याठिकाणी महिलांकरिता असणाऱ्या प्रसूतीगृहाचे बांधकाम लवकरात लवकर करावे, अशी मागणी आगरदांडा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

ही पदे रिक्त
आरोग्य कर्मचारी 4
आरोग्य सेविका 5,
कंपाऊंडर 1
शिपाई 2 ,
क्लार्क 1,
आरोग्य सहायिका 1
आरोग्य सहायक 1,
वाचमन 3

कर्मचारी नसल्याने आमच्यावर ताण पडत असला तरी आम्ही रुग्णांना चांगली सेवा देत आहोत. रिक्त पदोसंदर्भात आम्ही जिल्हा आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

डॉ. उज्ज्वलदीप बाबुरडे
(छायाचित्र : गणेश चोडणेकर)
Exit mobile version