रिक्त पदांमुळे रुग्णांना सेवा देताना अडचणी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणार्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार्या या उपकेंद्राला अपुर्या कर्मचार्यांमुळे रुग्णांना आरोग्य सेवा देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा ताण आरोग्य सेविकांवर पडत आहे.
या गंभीर विषयाकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देऊन राजपुरी, सावली, शिघ्रे, आगरदांडा, महालोर व खारअंबोली या ठिकाणीच्या उपकेंद्रातील आरोग्य सेवकांची रिक्त पदे तसेच आगरदांडा येथे आरोग्य साहिका (एल.एच.व्ही) एक पद रिक्त असून, लवकरात लवकर या पदाची नियुक्ती करावी, जेणेकरुन यांचा ताण आरोग्य सेविका व डॉक्टरवर पडणार नाही, अशी मागणी आगरदांडा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात मुरुड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, आरोग्य सेवकांची सहा पदे रिक्त आहेत. यासंदर्भात आमच्या वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. लवकरच या ठिकाणी आरोग्य सेवकांची भरती होईल, अशी प्रतिक्रिया डॉ. राठोड यांनी दिली.