अन्यथा प्रजासत्ताकदिनी रस्ता रोको
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड आगरदांडा ते खोकरी (राजपुरी) मुख्य रस्ता दुरुस्ती न झाल्यास प्रजासत्ताकदिनी आगरदांडा अदानी दिघी पोर्टच्या प्रवेशद्वा जवळ रस्ता रोको करणार असा इशारा मुरुड जंजिरा कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला. मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मुरुड जंजिरा कुणबी समाजोन्नती संघ अध्यक्ष संतोष पाटील, सचिव चिन पाटील, मनोहर वास्कर, राजेंद्र मिसाळ, धर्मा मिसाळ, आत्माराम कर्जेकर, मंगेश टकले, रामा आरकर, परशुराम आरकर आदिंसह नांदले, चिंचघर, उसडी चाफेगाव, जमृतखार, सावली, मिठागर या कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समितीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
मुरुड जंजिरा कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समितीच्या वतीने मुरुड सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता यांना गौरी गणपती सणा अगोदर आगरदांडा ते खोकरी (राजपुरी) मुख्य रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून देण्यात आले होते.परंतु निवेदनाला केराची टोपली दाखवून ग्रामस्थांची दिशाभूल केली. हा रस्ता पूर्ण खराब होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यातुन वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून ग्रामस्थांना वैयक्तिक, वैद्यकीय कामे वा इतर सर्वंच कामासाठी मुरुड शहराकडे दुचाकी घेऊन ये-जा करावे लागते. या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड व त्रासदायक झाले आहे. रुग्ण असो व गरोदर स्त्रियांना वैद्यकीय उपचारासाठी या रस्त्यावरून ये- जा करताना जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे.अशी मागणी सहा गाव कुणबी समाज संघाच्या वतीने करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी सकाळी 10 वाजता आगरदांडा अदानी दिघी पोर्टच्या प्रवेशद्वाराजवळ रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समितीने दिला आहे.