आगरकोट किल्ल्याचा भुयारी मार्ग अडगळीत

पुरातन खात्याचे दुर्लक्ष, पर्यटकांकडून नाराजी व्यक्त

| रेवदंडा | प्रतिनिधी |

पुरातन खात्याच्या दुर्लक्षतेने आगरकोट किल्ला तटबंदीतील भुयारी मार्ग अडगळीत असून, स्थानिक व पर्यटकांनासुद्धा माहिती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. रेवदंडा समुद्रकिनारी पोर्तुगिजकालीन आगरकोट किल्ला आहे. किल्लाच्या तिन्ही बाजूस समुद्रकिनारा असल्याने भली मोठी दगडी तटबंदीची वास्तू समुद्रलगत व किल्ला परिसरात अद्यापि पहावयास मिळते. पोर्तुगिज काळातील किल्ल्याचे अधिकारी, सैनिक आदींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वस्तीसाठी किल्ल्याच्या आत मोठे प्रशस्त सभागृह, शयनगृह व जेवणासाठी खोली असावी. या तटबंदीच्या आत जाण्यासाठी भुयारी मार्ग दोन-तीन ठिकाणी आहेत. सध्या भुयारी मार्गाने आतमध्ये जाण्या-येण्याचा मार्ग झाडेझुडपे वाढल्याने बंद आहेत. शिवाय, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने आतमध्ये पाणी साचते. स्थानिक युवकांनी एका भुयारी मार्गाची साफसफाई कोरोना काळाच्या आधी केली होती. तेव्हाचे भुयारी मार्गाचे संग्रहित छायाचित्र आजही पहावयास मिळते. पुरातत्व खाते व स्थानिक सामाजिक व राजकीय मंडळीने हे भुयारी मार्गातील स्वच्छतेसाठी निश्चित प्रयत्न करावे व इतिहासकालीन वास्तू पर्यटन वाढीसाठी खुली व्हावी अशी मागणी इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.

Exit mobile version