| रेवदंडा | प्रतिनिधी |
गावाचे वैभव असलेला आगरकोट किल्ला हा येथील ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या किल्ल्यातून गावातील मुख्य रस्त्यावर अहोरात्र वाहनांची जा-ये सुरू असते. कुंडलिका समुद्र खाडी पुलावरून येताना समोरील बोगद्याच्या तटबंदीवर मोठ मोठी झाडे वाढली आहेत. त्या झाडांच्या फांद्या मुख्यः रस्त्याच्या बाजूने पसरलेल्या आहेत. त्या फांद्यांमुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी अपघात होण्याआधी संबंधित विभागाने फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
या आगरकोट किल्ला तटबंदी मार्गाने अलिबागकडे जा-ये करणारी वाहने तसेच विविध व्यवहार करण्यासाठी रेवदंडा बाजारपेठेत भेट देणारे, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नित्याने ये-जा सुरू असते. निसर्ग चक्रीवादळात तटबंदीवरील वृक्षाचा काही भाग तुटून महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांवर पडला होता. भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडून नये यासाठी संबंधितांनी त्वरित लक्ष्य देऊन आगरकोट तटबंदीवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.