ऑनलाईन सभेच्या अजेंड्यावर प्रत्यक्ष सभा

पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार
प्रीतम म्हात्रे यांची कारवाईची मागणी

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. ऑनलाईन सभेचा अजेंडा असतानाही सभागृहाच्या नेत्यांना कोरोना नियमांचे उल्लंघन करत प्रत्यक्ष सभा घेतली आहे. यासंदर्भात विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली आहे. पनवेल महानगरपालिका स्थायी समितीच्या सभेचे सचिव कार्यालयामधून सूचना काढून ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते. मुळातच कोविड नियमांचे पालन व्हावे यासाठी सदर स्थायी समिती सभा ही शासन निर्णयानुसार ऑनलाईन घेणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेचे सभागृह नेते ऑनलाईन सभा असताना तिथे हजर होते.

या सभेत सभापती उपस्थित सदस्याच्या म्हणण्याप्रमाणे विषय क्र.4 व 5 संदर्भात सभागृहातील कोणतेही मत विचारात न घेता विषय मंजूर केल्याची घोषणा केली. दरम्यान, विषय क्र.3 हे मतास घ्यावे हे सांगण्यासाठी प्रितम म्हात्रे व सहकारी गणेश कडू यांनी सभागृहात प्रवेश केला असता संबंधित परिस्थिती सभागृहात त्यांना आढळली. याबाबत विरोधी पक्ष नेता म्हणून प्रितम म्हात्रे यांनी विचारणा केली असता, उपायुक्त सचिन पवार यांनी ऑनलाईन सभेत सदस्याला बोलावून सभागृहात बसायला देणे, हे सभापतींचे अधिकार असल्याचे उत्तर दिले.

ऑनलाईन सभेचा अजेंडा असताना सभेत अधिकारी व स्थायी समिती सदस्य हे प्रत्यक्ष सभागृहात कसे बसू शकतात? वरील विषयाबाबत उपायुक्तांनी सांगितल्याप्रमाणे सभापतींच्या अधिकाराचा शासन निर्णय असेल तर माहितीसाठी मला द्यावा. अन्यथा शासन निर्णय तोडून प्रत्यक्ष उपस्थित असणार्‍यांवर योग्य ती कार्यवाही करावी. – प्रितम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते, पनवेल महानगरपालिका

Exit mobile version