जरांगेंचे तीन शिलेदार पोलिसांच्या ताब्यात
| जालना | वृत्तसंस्था |
अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे. यावेळी बसच्या काचादेखील फोडल्या आहेत. तसेच, राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद केलं आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी काल अंतरवाली सराटीत बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘फडणवीस माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय’ असं म्हणत जरांगे यांनी गंभीर आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केले होते. ‘फडणवीस यांना माझा बळीच हवाय ना, तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या’, असं म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, राज्य सरकारनं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. यानंतर राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत इंटरनेट बंद केलं आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या अंबड आगाराची बस अंबड-रामसगाव मुक्काम करून परत येत होती. यावेळी सकाळी सातच्या सुमारास तीर्थपुरी या गावात मराठा आरक्षण आंदोलकांनी दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच, बस पेटवून दिली. त्यामुळे मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर या तिघांना आज सोमवारी (दि.26) सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.