सार्वजनिक ठिकाणी प्रकार घडल्याने खळबळ
| नेरळ | संतोष पेरणे |
नेरळ गावातील एकमेव आणि महत्त्वाचे मनोरंजनाचे ठिकाण असलेल्या राजमाता जिजामाता तलाव परिसरात अघोरी विद्येचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 10 जानेवारीच्या रात्री हा प्रकार करण्यात आल्याचा अंदाज असून, सार्वजनिक व कायम गर्दी असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या राजमाता जिजामाता तलाव परिसरात चालण्यासाठी ट्रॅक, ओपन जिम आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा असल्याने सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हा परिसर खुला असतो. परिसराला कुलूप, पथदिवे आणि प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मात्र, 11 जानेवारी रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना ओपन जिमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लाल कापड, त्यावर ठेवलेले नारळ, लिंबू, सुपारी व नागवेलाची पाने आदी साहित्य आढळून आले. एकाच ठिकाणी अनेक नारळ आढळल्याने हा अघोरी विद्येचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हा प्रकार पाहून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक ठिकाणी अघोरी विद्येसाठी हेच ठिकाण का निवडले गेले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी बंद असलेल्या तलाव परिसरात प्रवेश कसा झाला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. कुंपणावरून प्रवेश केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकारामुळे नेरळ परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असून, अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.





