महागाईच्या विरोधात रायगडात शेकापचे आंदोलन

मोदी सरकारचा निषेध,तहसिलदारांना निवेदन
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रायगडात शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने इंधन, गॅस आदी जीवनावश्यक वस्तुंच्या दरात होत असलेल्या दरवाढीचा सोमवारी निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तहसिलदारांना शेकापच्यावतीने निवेदन देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेधही करण्यात आला.
शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी गॅस, पेट्रोल, डिझेल या वस्तूंच्या दरवाढीविरोधात सर्व तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्याची सूचना केली होती. त्याप्रमाण अलिबाग, रोहा, खालापूर, पेण, पनवेल, तळा, म्हसळा, महाड, कर्जत, मरुड, उरण, सुधागड-पाली, श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर या सर्व तालुक्यांमध्ये शेकापच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
केंद्र शासन घरगुती वापरात आवश्यक असलेल्या गॅस,पेट्रोल,डिझेल यांच्या किंमतीत सातत्याने वाढ करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजना सुरु केली. परंतु गॅस सिलिंडरची किंमत आता 900 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे व्यावसायिक, मच्छिमार व सामान्य मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस,पेट्रोल,डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अलिबाग तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली.
जि.प. सदस्या चित्रा आस्वाद पाटील यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेही जि.प. सदस्य भावना पाटील, तालुका चिटणीस अनिल शांताराम पाटील, पं.स. सभापती प्रमोद ठाकूर, सदस्या रचना पाटील, माजी सभापती जनार्दन पाटील, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, अलिबाग न.प. पाणीपुरवठा सभापती राकेश चौलकर, नगरसेविका सुरक्षा शहा, वृषाली ठोसर, संजना किर, नगरसेवक अनिल चोपडा, महिला आघाडी शहर अध्यक्ष पल्लवी आठवले व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्‍वासन दिले, की गॅस व इंधन दर कमी होतील. पण, सत्ता आल्यानंतर पूर्ण उलटे झाले आहे. पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील,जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी याविरोधात आवाज उठवायचा ठरवला व याचा निषेध केला.
अनिल शांताराम पाटील, तालुका चिटणीस


सामान्य नागरिकांना महागाईचा प्रश्‍न भेडसावत आहे. त्याविरोधात शेकापच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेय. प्रत्येक गोष्टीवर अर्थकारण अवलंबून आहे. गॅस व इंधन दर वाढतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर होतो. मूलभूत गरजा महाग होत असल्यामुळे नागरिकांना संताप झाला आहे.
चित्रा पाटील,जि.प. सदस्य

Exit mobile version