रस्त्यासाठी शेकापचा एल्गार

अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी उद्या रास्ता रोको

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग रामराज रस्त्याची आजघडीला अत्यंत भयावह दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होऊन मार्ग सुस्थितीत यावा व जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी शेेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यांसदर्भात शेकाप वर्धापनदिनी सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी इशारा देत टक्केवारीत अडकलेल्या अलिबाग-रामराज-रस्त्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
अलिबाग रोहा रस्ता आ. जयंत पाटील, तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी प्रयत्न करत 225 कोटी करुन निवीदा काढल्या. या रस्त्याची वर्क ऑडर काढली. मात्र सत्तापालट झाल्यानंतर टक्केवारीवरुन रस्ता तसाच राहीला आहे. श्रेयवाद करीत रस्त्याचे पुन्हा नारळ फोडले गेले. 40 वर्षात केला नाही असा गाजावाजा करुन सांगण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्यक्षात काम मात्र काहीच केले नाही. त्यावर आ. जयंत पाटील यांनी वर्क ऑर्डर आणत नितीन गडकरीं यांचकडे पाठपुरावा करीत निधी देखील मंजुर करुन घेतला. मात्र टक्केवारीत अडकलेल्या या रस्त्याचे काम आपण पावसाळ्यानंतर सुरु करण्याचा निर्धार जयंत पाटील यांनी केला होता. त्यानुसार शेकापक्षाने निर्णय घेत बंद पडलेले काम पावसाळा संपल्यानंतर चालु करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे सदर काम चालु  करायला भाग पाडण्यासाठी आता शेकापने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. सकाळी 9 वाजता खानाव येथे पुकारण्यात आलेल्या या आंदोलात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने नागरिकांना हॉस्पिटल, कोर्ट, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच इतर सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालयात सतत काही ना काही कामासाठी जावे लागते. अलिबाग रामराज रस्त्याची आज जी दुरावस्ता झाली आहे. या मार्गावरून चारचाकी तर सोडा, दुचाकी चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. अलिबाग येथे नोकरी धंद्याच्या निमित्ताने रोज अप-डाऊन करणार्‍यांची स्थिती अगदी केविलवाणी झाली आहे.

Exit mobile version