पाण्यासाठी आदिवासी ग्रामस्थांचे उपोषण

| नेरळ । वार्ताहर ।

नेरळ जवळील आणि नेरळ विकास प्राधिकरण मधील ममदापुर ग्रामपंचायत मधील आदिवासी वाडीपर्यंत नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही. त्यामुळे तेथील आदिवासी ग्रामस्थांनी गुरुवार (दि.8) ममदापुर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत ममदापूर ग्रामपंचायत करिता सन 2014-15 या आर्थिक वर्षात मंजूर झाली होती, या योजनेमधून पाणी पुरवठा केल्या जाणार्‍या ममदापुर वाडीपर्यंत नळपाणी योजनेचे पाणी पोहचले नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ममदापूर ग्रामपंचायत तसेच ममदापूर ग्रामस्थ यांचा त्या योजनेच्या पाण्यावर हक्क आहे. मात्र नळपाणी योजनेचे पाणी ग्रामपंचायतमधील अन्य ग्रामस्थ तसेच नवीन वसाहतीमध्ये घरोघरी पोहचले आहे.

मात्र आदिवासी कुटुंबापर्यंत नळाचे पाणी पोहचले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतवर मोर्चा काढला होता. त्यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 15 दिवसात वाडीपर्यंत पाणी पोहचेल अशी माहिती दिली होती. त्यावेळी नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतने नवीन वीज रोहित्र खरेदी करून बसविले आणि पाणी पुरवठा सुरु केला. मात्र तरी देखील वाडीमध्ये पाणी पोहोचण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या असून पाणी पोहचले नसल्याने पाच डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी दोन दिवस उपोषण पुढे ढकलावे अशी सूचना केली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील मार्ग निघाला नसल्याने वाडीमधील ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या वतीने हिरू निरगुडा,कमळू निरगुडा हे दोघे उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत.

त्यात चांगो पारधी, गणेश निरगुडे, जगन दरवडा, जगदिश दरवडा, राजू झुगरे, रोशन शिंगे,दशरथ निरगुडा,सचिन अभंगे, दीपक निरगुडे, अनंता पारधी, राम पारधी, संदेश दरवडा, हरी पारधी, चांगो पारधी, रमेश निरगुडे, नीलेश निरगुडे, काळूराम दरवडा, जगन दरवडा, कृष्णा हिरवे, विजया झुगरे, सुरेखा निरगुडे, अंजना पारधी, लक्ष्मी निरगुडे, हिराबाई निरगुडे, जिजाबाई ठोंबरे, अश्‍विनी पारधी, शोभा पारधी, मंजुळा पारधी, कुंदा निरगुडे आदी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत.

आखाडा वाडीपर्यंत नळाचे पाणी पोहचले असून पुढे चढावाचा भाग असल्याने आखाडा वाडी येथे लावण्यात आलेली मोटार कमी दाबाची असल्याने पाणी पुढे वेगाने जात नाही. साडे सात हॉर्स पॉवर क्षमतेचे मोटार खरेदी केली असून ती मोटार पुणे येथून नेरळ ममदापुर येथे येण्यास निघाली आहे. ती मोटार येताच तात्काळ आखाडा वाडी येथे पाच एचपीची मोटार काढून नवीन मोटार बसविली जाईल. त्यानंतर पाणी ममदापुर वाडी पर्यंत पोहचेल असा विश्‍वास आहे.

संजय राठोड
ग्रामविकास अधिकारी
Exit mobile version