वीजपुरवठा पुर्ववत करा, नाहीतर….ग्रामस्थांनी दिला इशारा

Exif_JPEG_420

बोर्ली, मांडला,भोईघर सरपंचांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन
। कोर्लई । वार्ताहर ।
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्व सुचना न देता बंद करतात. त्यामुळे ग्रामस्थांना रात्री विषारी जीवापासून केव्हाही अपघाताची शक्यता आहे. त्यासाठी तातडीने पथदिव्यांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरू राहणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा तातडीने सुरळीत पुर्ववत करण्यात न आल्यास ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांना देण्यात आला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा आगाऊ सूचना न देता महावितरणने खंडित केला आहे. याविषयी विचारणा केली असता वीजबिलाचे कारण देण्यात आले. वीजबिलाचे कशाप्रकारे नियोजन करायचे यासाठी ग्रामविकास खात्याकडून कोणतेही ठोस मार्गदर्शन उपलब्ध नाही. ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे चालू ठेवणे ही पंचायतीची जबाबदारी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदर सोई पुरवण्यासाठी बांधील आहोत. परंतु आमची इच्छा असून सुद्धा पथदिव्यांची बिले भरण्यास हतबल आहोत.

सदर बिले कशाप्रकारे भरायची, किती भरायची, भरण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करायचे याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. परंतु, वीज बिलाबाबतचे योग्य ते नियोजन होईपर्यंत पथदिवे पूर्ववत करण्यासाठी महावितरणाला कळविण्यात यावे. जेणेकरून पावसाळा सुरू झाला असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही. ग्रामविकास खाते व ऊर्जा खाते यांच्यातील संवादाच्या अभावामुळे नाहक ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. व त्याचे खापर ग्रामपंचायतीवर फोडण्यात येत आहे. यावर तातडीने ठोस निर्णय घेऊन ग्रामपचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाला निर्देश द्यावेत व पथदिव्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा. अन्यथा याविरोधात आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मग याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सरपंच चेतन जावसेन (बोर्ली), काशिनाथ वाघमारे (भोईघर), सुचिता सुरेश पालवणकर (मांडला) उपस्थित होते.

Exit mobile version