आगरी समाज संघटनेने केला विद्यार्थी गुणगौरव

। महाड । वार्ताहर ।

महाड-पोलादपूर आगरी समाज संघटने मार्फत दरवर्षी आयोजित केला जाणारा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. प्रभाकर गावंड हे होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर गावंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पावशे, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, सुधाकर ठाकूर, सचिव अमृत पाटील, महिला प्रमुख दीप्ती गावंड, ज्येष्ठ सदस्य हनुमंत म्हात्रे, संघटनेचे खजिनदार संदीप शेरमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दहावी, बारावी, शिष्यवृत्ती आणि विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाज संघटनेतील विविध सभासदांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये आपदा मित्र म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सुरेश पाटील, थरवळ कन्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून नुकत्याच नियुक्त झालेल्या प्रतिभा गावंड, मुख्यमंत्री माझी शाळा प्रथम क्रमांक अक्षता घरत, एम. ए. एज्युकेशन पदवी दीप्ती गावंड, निपुण भारत पुरस्कार प्राप्त दिनेश गावंड यांनाही सन्मानित करण्यात आले.

आपल्या अध्यक्षपदाच्या भाषणात बोलताना डॉ. प्रभाकर गावंड यांनी संघटनेच्या गेल्या वीस वर्षातील वाटचालीचा आढावा घेऊन गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप ही त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सुरेश पाटील यांनीही आपल्याला मिळालेला सन्मान हा इतर सर्व पुरस्कारांपेक्षा अनमोल असल्याची सांगताना संघटनेतील सभासदांच्या अनेक मुलांनी विविध क्षेत्रात महत्वाच्या पदांवर भरारी घेतल्याचे सांगितले.

Exit mobile version