। गडब । वार्ताहर ।
आपल्यावरील अन्यायाविरुद्ध चार-दहा लोकं एकत्र येऊन उपोषणे, मोर्चे, आंदोलने करण्याच्या लुटुपुटुच्या लढाईने अकारण आपली शक्ती खर्ची करतात. त्याऐवजी अखंड समाजाने एका छत्राखाली येऊन संघटित एकजूटीचे दर्शन घडविले तर शासनकर्ते काय आणि प्रशासनकर्ते काय, सार्यांनाच समाजापुढे झुकावे लागेल. यासाठी आगरी समाजाने एकजुटीची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण तालुक्यातील गडब येथे आगरी समाज बांधवांच्या सभेत बोलताना व्यक्त केला.
अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेतर्फे कासू विभागातील समाज बांधवांची जाहीर सभा गडबच्या ‘परमार्थ सदन’ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगनशेठ म्हात्रे, बाबूशेठ तांबोळी, मानसी पाटील, अनंत पाटील, पी.वाय. पाटील, डॉ. सुरेंद्र धुमाळ, जीवन पाटील, संध्या म्हात्रे, सिता पाटील, सिताराम लांगी, सदानंद ठाकूर, हिरामण पाटील, देविदास पाटील, लवेंद्र मोकल, दामाजी कोठेकर, अनंत चवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुर्यकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले, लोकशक्तीची ताकद किती अफाट असते याची प्रत्यक्ष अनुभूती एकेकाळी गडबकरांनी शासन-प्रशासनकर्त्यांना आणून दिली आहे. त्याच एकजुटीची ताकद पुन्हा दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत शासनकर्त्यांनी समाजावर अतोनात अन्याय-अत्याचार केले आहेत. अलिकडे तर त्याचा प्रचंड अतिरेक होऊ लागला आहे. ज्या जमिनी जगण्याचे साधन म्हणून आगरी पूर्वजांनी अविश्रांत परिश्रमाने नवनिर्माण केल्या, ज्या जमिनी पूर्वीच्या नेत्यांनी कुलकायद्याच्या माध्यमातून सावकारांकडून काढून कुळांकडे सोपविल्या, त्याच जमिनी आज पुन्हा शासनकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकार्यांनी त्यांच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा सपाटा चालविला आहे. आणि पुन्हा आगरी समाजाला गुलामीकडे ढकळण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तर दुसरीकडे भूमिहीन होणार्या तरुणांच्या रिक्त हातांना काम देण्याऐवजी त्यांना डावलून उपलब्ध नोकर्या परक्यांच्या घशात घातल्या जात आहेत. या सार्या प्रकारामुळे आगरी समाज अधोगतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. म्हणूनच आज त्याच्या अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. या उजाड भविष्याचा आजच विचार केला नाही तर उद्याचा काळ समाजाच्या दृष्टीने अतिशय कठीण असणार आहे. शासनकर्त्यांची मुजोरी आणि लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता यामुळे समाजाची प्रचंड हेलसांड होत आहे. आपल्या मायभूमीतूनच आगरी माणसाला बेदखल व्हावे लागले आहे. परक्यांच्या भाऊगर्दीत त्यांचा स्वास कोंडू लागला आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.