| माणगाव | प्रतिनिधी |
तळेगाव,ता.माणगाव येथील भातशेतीला एक महिन्यापासून डोलवहाळ बंधार्याचे कालव्याला पाणी सोडणे बंद करण्यात आले होते त्यामुळे भातशेती पिकण्याआधीच सुकली आहे. याबाबत कृषीवलमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने तळेगाव मार्गावरील कालव्याला तत्काळ पाणी सोडले. यामुळे भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात होणार्या नुकसान टळले आहे.
डोलवहाळ बंधार्याच्या पाण्यावर उन्हाळी रब्बी हंगामातील भाताचे पिकाची लागवड शेतकर्यांनी फेबुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली आहे. मात्र यंदाच्या वर्षी काळप्रकल्पाच्या कालव्याला मुदतीत पाणी न सोडल्याने तसेच 2 वेळ अवकाळी पाऊस पडल्याने शेतकर्यांनी यंदा कमी प्रमाणात भात पिकाची पेरणी करून लागवड केली होती.
पाटबंधारे विभागाने यंदाचे वर्षी 15 डिसेंबरची कालव्याला पाणी सोडण्याची डेडलाईन चुकवून हे पाणी 31 डिसेंबरला कालव्याला सोडले होते. त्यामुळे शेतकर्यात भात पिक घेण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अनेक शेतकर्यांनी भातशेती ऐवजी कडधान्य पिकवण्याकडे धाव घेतली. त्यामुळे यंदाचे वर्षी हजारो हेक्टर भात पिकाचे क्षेत्र कमी झाले. कांही शेतकर्यांनी भाताचे पारंपारिक पिक घेतले त्यामुळे यंदाचे वर्षी 98 हेक्टवर भातपिक उभे आहे.याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पिकाची लागवड शेतकर्यांनी केली होती. कोकणातील माणसांचे मुख्य अन्न भात हे असून माणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी यंदाचे वर्षी फक्त 98 हेक्टर म्हणजेच 245 एकरवर भात पिक लावले आहे.
तळेगाव मधील शेतकर्याना महिन्याभरापासुन कालव्याचे पाणी न मिळाल्याने माणगाव तालुक्यातील तळेगाव येथील शेकडो एकर शेती धोक्यात आली असून हे पिक सुकले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनातून पाटबंधारे विभागाला देत चांगलेच धारेवर धरले. तसे वृत्त प्रसिद्ध होताच पाटबंधारे विभागाने तातडीने पाणी सोडले.