डॉ. भारत वाघमोडे यांचे प्रतिपादन
| वेणगाव | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्सकडून मोठमोठ्या नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पास मान्यता मिळत असल्याने कर्जतचे कृषी संशोधन केंद्र लवकरच जागतिक दर्जाचे भात संशोधन केंद्र होईल, असे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक डॉ. भारत वाघमोडे यांनी व्यक्त केले. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचा वर्धापन दिन मुख्य इमारतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐतिहासिक वारसा असलेल्या संशोधन केंद्राच्या मुख्य इमारतीतील कोनशिलेचे पूजन केल्यावर डॉ. वाघमोडे यांनी डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनीही पुष्पांजली अर्पण करीत विनम्र अभिवादन केले. यानिमित्ताने 39 वे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे यांचा कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
डॉ. भारत वाघमोडे पुढे म्हणाले की, भात जलद पैदास प्रकल्प, महाअन्नपूर्णा-बदलत्या वातावरणानुरूप भातपिकावरील संशोधन प्रकल्प मंजूर झाल्याने जागतिक दर्जाचे संशोधन करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण होतील. त्यामुळे कोकणातीलच नव्हे तर राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आता 14 वर्षांऐवजी 6-7 वर्षातच वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्ये असलेल्या भात जाती विकसित करणे शक्य होईल. अद्ययावत भात लागवड तंत्रज्ञान देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील मोजक्याच संस्थांत व महाराष्ट्रात फक्त कर्जत येथेच हा प्रकल्प सुरू होत असल्याचा उल्लेख करीत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी 14 ऑगस्ट 1919 रोजी स्थापन झालेल्या या संशोधन केंद्राचा देदीप्यमान इतिहास, संशोधित झालेले विविध भात वाण आणि उत्पादनातील योगदान नेटक्या शब्दात विदित केले. सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व मजूर वर्गाने समर्पित भावनेने काम केल्यास केंद्राचा नावलौकिक जगभरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.






