| कर्जत । वार्ताहर ।
युनायटेड वे मुंबई, जल संजीवनी कर्जत प्रकल्पद्वारे तालुक्यातील अंभेरपाडा, खांडस, नांदगाव, वारे आणि पाथरज ग्रामपंचायतीतील शेतकर्यांसाठी दोन दिवसीय शेती विषयक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. एकूण 38 शेतकर्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पहिल्या दिवशी कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी आयोजित केलेल्या कृषिक या कृषि प्रदर्शनास भेट देण्यात आली. ह्या अभ्यास दौरा मागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, पिक प्रात्याक्षिके, सूक्ष्म सिंचन पद्धत, सुधारित औजार वापर, सेंद्रिय शेती तसेच शेती पूरक व्यवसाय ज्यात मधमाशी पालन, मत्स्यपालन, कुक्कुट पालन, मशरूम उत्पादन, अझोला उत्पादन आदी संदर्भात माहिती घेऊन त्याचा वापर करून आर्थिक उत्पन्न कसे वाढविता येईल ह्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आला.
अभ्यास दौर्याचा दुसरा दिवस युनायटेड वे मुंबई संस्थेने सोलापूर येथील बार्शी तालुक्यातील सुर्डी आणि इतर गावात लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणची कामे, शेतकरी उत्पादक कंपनी भेट, मल्टीलेयर शेती आणि शेततळे यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. युनायटेड वे मुंबईचे प्रतिनिधी भीमाशंकर ढाले आणि अजीज तांबोळी यांनी शेतकर्यांना लोकसहभागाने केलेल्या कार्याची माहिती दिली. शेतकर्यांनी दौर्याहून परतल्यानंतर आपल्या आणि गावाच्या विकासासाठी कशा पद्धतीने या दौर्याचा उपयोग करून घेता येईल या संबंधी मधुकर डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले.