महापालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
। पालघर । प्रतिनिधी ।
भाईंदर पश्चिमेला उत्तन येथे कचरा प्रकल्प सुरू केल्यापासून स्थानिक नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेने भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे कचरा प्रकल्प सुरू केले आहेत. या कचरा प्रकल्पाच्या एका बाजुची भिंत तुटल्यामुळे त्यातून निघणारे घाण लिचडचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये जात आहे. त्यामुळे पाली गावातील शेतकर्यांच्या शेतातील भात पिक करपले आहे. भात पिक करपल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा पंचनामा करून शेतकर्यांना महापालिका व महसूल विभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी नगरसेविका शर्मिला बगाजी व मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी प्रशासनाकडे केली आहे.
तसेच, हा कचरा प्रकल्प सुरू केल्यापासून स्थानिक नागरीकांना अनेक समस्यांना ही तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याकडे महापालिका दुर्लक्ष करत असून टेंडर काढून कचरा प्रकिया (सेग्रीकेशन) करू असे आश्वासन देऊन गावकर्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे.
नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कचरा प्रकल्पात जमा झालेला कचरा कमी करू अशी फक्त घोषणा केल्या जातात. परंतु, आज पर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केल्या जात नाहीत. लिचड पाण्याच्या जलशुद्धीकरणाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री फसवले जात आहे, असे गावकर्यांनी सांगितले. दरवर्षी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे अनेक शेतकर्यांनी भात शेती लावण्याचेच बंद केले आहे. शेतकर्यांना कोणतेही उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त ओला कचरा सुका कचरा वेगळा करुन कचरा प्रकल्पावर टाकण्यासाठी करोडो रुपयांचे टेंडर काढले जात आहे. यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले जात आहेत. बायोमायानिंग प्रकिया सुरू केली होती ती सुद्धा गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. नागरीकांची फक्त दिशाभूल केली जात आहे, अशा तक्रारी आहेत.