| सोगाव | वार्ताहर |
जगाचा पोशिंदा असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतात यावर्षी पिवळ्या भाताचे सोन्याचे पीक बहरून व भरभरून आल्याने शेतकरी मोठ्या आनंदात आहे. पावसाने यावर्षी अगदी वेळेत उघडीप दिल्यामुळे आपल्या शेतात बहरून आलेले भाताचे पीक घरी आणण्याची घाई अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागातील शेतकरी करताना दिसत आहे.
यावर्षी मापगाव पंचक्रोशीतील बहुतांश भातशेतामध्ये चांगल्या दर्जाचे पीक आले आहे, यामध्ये भातपिकासाठी शेतकर्यांनी कर्जत, रूपाली, जया, शुभांगी, साई, सुवर्णा आदींसह भात बियाण्यांची लागवड केली होती. यावर्षी पावसाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे शेतामध्ये समाधानकारक शेतीयुक्त पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात भातपीक आले. यामुळे सर्व शेतीमध्ये जणू सोनेरी शाल पांघरल्या सारखे दिसून येत आहे. यामुळे याभागातील शेतकरी मोठा आनंदात आहे.
शेतकर्यांनी भातकापणी व मळणीच्या कामांना जोरदार सुरूवात केली आहे. शेतावर काम करणार्या शेतमजुरांची मजुरीचे दर वाढल्यामुळे व मजुरांचा तुटवडा होत असल्याने कापणी व मळणी कामासाठी काही प्रमाणात शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे बहुतांश शेतकरी स्वतःच शेती कामात व्यस्त झाला आहे.