शेतकऱ्यांना औषध फवारणीचे प्रात्यक्षिक; बचत गटांना ड्रोनसाठी प्रयत्न कराः जावळे
| अलिबाग | प्रतिनिधी |
बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील फळ पिकांना बसतो. मनुष्यबळाचा अधार घेत पिकांवर औषध फवारणी केली जाते. परंतु, त्यासाठी वेळ खूप खर्च होतो. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जिल्ह्यातील बचत गटांना औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयत्न करूया. त्याप्रमाणे नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायती आणि बचतगटांनी ड्रोन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कृषि अधीक्षक अधिकारी व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील वाडगांव येथे मंगळवारी (दि.1) कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर, महिला शेतकरी स्वाती नागावकर, रविंद्र पाटील, हेमंत गुरसाळे, डॉ. मकरंद आठवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी शेतकऱ्यांना तूर आणि नाचणी बियाणे वाटपही यावेळी करण्यात आले.
ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक
जिल्ह्यात भातशेतीप्रमाणेच आंबा बागयतीही मोठ्या प्रमाणात आहेत. हवामान बदलामुळे फळांवर किडरोगाचा धोका असतो. मनुष्यबळाचा वापर करून औषध फवारणी केली जाते. मात्र, त्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र, ड्रोनच्या मदतीने पिकांवर फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा वेळही वाचू शकतो. त्यामुळे ही फवारणी पिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याने ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
कृषि स्पर्धेतील यशस्वी शेतकरी, कृषि सहाय्यक म्हणून उत्कृष्ट काम करणारे गुळसुंदे-पनवेल येथील प्रसाद पाटील, वाशी-पेण येथील सतीश गायकवाड व कुर्डुस-अलिबाग येथील वीणा सूर्यवंशी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
