कृषी विभागाचा स्तुप्त उपक्रम; उत्पादन खर्चात बचत
| तळा | वार्ताहर |
मागील काही दिवसातील वरुण राजाच्या दमदार हजेरी नंतर तळ्यामध्ये भात लागवडीला वेग आला आहे. तळा कृषी विभागाकडून भात लागवडीच्या विविध सुधारित पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरती जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून तळा तालुक्यातील ताम्हाणेतर्फे तळे, खांबवली, शेणाटे येथे कृषी सहाय्यकांनी स्वतः शेतामध्ये उभे राहत शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचे मार्गदर्शन केले.
ताम्हाणेतर्फे तळे येथील प्रगतशील शेतकरी विलास धाडवे खांबवली येथील रमेश हिलम व शेणाटे येथील जनाबाई कोळी यांच्या शेतावर मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे, कृषी सहाय्यक दिनेश चांदोरकर आत्मा बी.टी.एम. सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली.
या पद्धतीने पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. रोपे कमी लागतात त्यामुळे रोपांची बचत होते. अर्थात बियाणे बचत होते, हवा खेळती राहते व रोपांना सूर्याप्रकाश चांगला मिळतो. त्यामुळे कीड व रोगाला बळी पडण्याची शाक्यता कमी असते, औषध फवारणी करण्यास तसेच तण काढण्यास सोयीस्कर होते, खतांची बचत होते, मजूर खर्चात बचत होते, भाताची वाढ चांगली होते व भाताचे उत्पादन वाढते. चार सूत्री लागवडीमध्ये पिकाच्या अवशेषानचा फेरवापर होतो, गिरीपुष्प पाल्याचा खत म्हणून वापर, भाताची दोरीच्या साहाय्याने 15 सेंमी बाय 25 सेंमी वर नियंत्रित लागवड, चार चुडाच्या चौकोनात मधोमध युरिया ब्रिकेटचा हेक्टरी 168 किलो वापर केला जातो. या पद्धतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन भाताच्या उत्पादनात वाढ होते, तसेच रोपांची चांगली वाढ होते कृषी विभाग चारसूत्री भात लागवड क्षेत्रात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.
तालुक्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत 25 एकर क्षेत्रावरती चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे व यासाठी रत्नागिरी आठ या सुधारित व जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकाच्या बियाण्याचे वाटप शेतकऱ्यांना मोफत दिले.
सचिन जाधव, मंडळ कृषी अधिकारी