सावधान! बोगस बियाण्यांवर कृषी विभागाची नजर

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला

| रायगड | प्रतिनिधी |

खरीप हंगामाची चाहूल लागताच रायगड जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. भात, भाजीपाला आणि इतर पिकांच्या बियाण्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मात्र, याच काळात बोगस बियाणे विकणारे एजंट, बनावट कंपन्या आणि अप्रमाणित व्यापारी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांसमोर फसवणुकीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन
दरवर्षी खरीप हंगामात बियाण्यांची उगवण न होणे, कमी उत्पादन मिळणे किंवा चुकीच्या वाणाची बियाणे विक्री झाल्याच्या तक्रारी समोर येतात. अनेक वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. परिणामी आर्थिक फटका बसतो आणि संपूर्ण हंगाम धोक्यात येतो. त्यामुळे यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता सर्व बाबी तपासून खरेदी करावी, असा इशारा कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
बियाणे घेतांना काय काळजी घ्यावी
बियाण्याच्या प्रत्येक पिशवीवर असलेला प्रमाणपत्र क्रमांक, उत्पादन कंपनीचे नाव, पॅकिंग तारीख, वैधता कालावधी, अंकुरण क्षमता आणि शुद्धतेची माहिती तपासणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शासनमान्य आणि नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, असेही सांगण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा बाजारपेठांमध्ये स्वस्त दरात बियाणे देण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र, अशी बियाणे अप्रमाणित किंवा निकृष्ट दर्जाची असण्याची शक्यता असते. त्यामुळे आकर्षक जाहिराती आणि अधिक उत्पादनाच्या दाव्यांना बळी पडू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
पावती जपून ठेवण्याचा सल्ला
शेतकऱ्यांनी खरेदी करताना हमखास बिल घ्यावे आणि ते सुरक्षित ठेवावे. बियाण्यांची पिशवी, टॅग आणि खरेदीची पावती भविष्यात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. बियाणे उगवले नाही किंवा फसवणुकीचा संशय आल्यास तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार करता येणार आहे.
खबरदारी बाळगण्याचे आवाहन
दरम्यान, मान्सूनपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, जिल्ह्यात पेरणीसाठी लगबग वाढली आहे. बाजारात विविध कंपन्यांची बियाणे दाखल झाली असली तरी अनधिकृत बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

खरीप हंगामात बाजारात बोगस बियाण्यांची विक्री होण्याची भीती अधिक असते. अशावेळी शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. कृषी विभागानेही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. विविध भरारी पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून गैरप्रकारांवर नजर राहणार आहे.

वंदना शिंदे,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
Exit mobile version