दुबार शेतीला अवकाळीचा फटका

भाताच्या शेतीचे मोठे नुकसान

। नेरळ । प्रतिनिधी ।

मंगळवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसासह वादळी वार्‍याने संपुर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यानंतर पुन्हा बुधवारी (दि.7) सकाळी अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावल्याने दुबार शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेले भाताचे पीक मोठ्या प्रमाणात जमिनीवर कोसळले असून शेतं पाण्याने भरली आहेत. त्यामुळे राजनाला कालवा परिसरातील हजारो हेक्टर जमिनीवरील भाताचे पीक धोक्यात आले आहे. तसेच, सध्या लग्न सराई सुरू असून पावसामुळे लग्न सोहळ्यातील कापडी मंडपांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी सायंकाळपासून वादळी वार्‍याला सुरुवात झाली. रात्री दहा वाजताच्या सुमारास विजांच्या लखलखाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण एक तास चांगला पाऊस झाला आणि पिकांनी भरलेली शेती पाण्याने भरली. त्यात सर्वाधिक नुकसान हे कर्जत तालुक्यातील पाझर तलाव आणि राजनाला कालव्याच्या पाण्यावर शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात कर्जत पूर्व भागात राजनाला कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडले जाते. या कालव्याच्या पाण्यावर यावर्षी 1,040 हेक्टर जमिनीवर भाताची शेती करण्यात आली आहे. त्यात 30 एप्रिलपासून पाटबंधारे विभागाने कालव्यात पाणी सोडण्याचे बंद केले असून राजनाला कालवा परिसरातील 30 गावातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी भाताची कापणी सुरू केली आहे. त्याच दरम्यान दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले आणि कापणी करून ठेवलेले भाताचे पीक भिजले आहे. त्यामुळे हे पिक शेतातच कुजून जाण्याची भीती हेदवली गावातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

राजनाला कालवा परिसरात वेणगावपासून कडाव आणि पोटल हुमगाव, वैजनाथपासून हेदवली सावळेपर्यंतच्या सर्व गावातील शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचवेळी तालुक्यातील पाथरज डोंगर पाडा, सोलनपाडा जामरुंग, अवसरे, पाषाण, साळोख आदी पाझर तलाव लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर दुबार शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे देखील अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

Exit mobile version