पाण्याअभावी दुबार शेती संकटात

कालवे स्वच्छ न केल्यामुळे शेतकरी नाराज; भात शेतीचे प्रमाण 25 टक्के पेक्षा खाली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब रस्त्यावर अवसरे येथे लघुपाटबंधारे प्रकल्प आहे. या प्रकल्पातून गेल्या दहा वर्षापासून शेतीसाठी पाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी नाराज असून भाताच्या शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी भाताची दुबार शेती करीत नाहीत. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांशी चर्चा करून कालवे स्वच्छ करण्याची कामे करावीत आणि नंतरच पाणी सोडावे अशी मागणी केली आहे, परंतु कालव्यांची स्वच्छता न करता पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी नाराज आहेत.

अवसरे येथे असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर पूर्वी अवसरे, वरई, माणिवली, बिरदोले आणि कोदीवले या गावातील शेतकरी भाताची शेती करत होते.
मात्र, धरणातील गाळ काढण्याचे कोणतेही नियोजन पाटबंधार खात्याकडे नसल्याने यथावकाश धरणाचे कळव्यात सोडलेले पाणी पुरेसे मिळेनासे झाले. धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही आणि त्यामुळे भाताच्या शेतीला पाणी देखील कमी सोडले जाऊ लागले होते. परिणामी भाताची शेती करणे कमी होऊ लागले आणि आता पाणी सोडले जात आहे, पण ते पाणी भातासारख्या शेतीसाठी अपुरे पडत आहे. त्यात धरणातील पाणी सोडण्यासाठी असलेल्या कालव्यांची अनेक वर्षे दुरुस्ती आणि स्वच्छतेची कामे पाटबंधारे विभागाने केली नाही. त्यामुळे शेवटच्या शेतात चार महिन्यानंतर देखील पाणी पोहचणे बंद झाले आहे.
कोदिवले, बिरदोले आणि अवसरे भागातील काही शेतकरी आजही भाताची शेती करतात, पण दुबार शेती करण्याचे प्रमाण जेमतेम 25 टक्के पर्यंत खाली आले आहे. अवसरे धरण परिसरातील शेतकरी आजही दुबार शेती करण्यास तयार आहेत, मात्र भाताची शेती करण्यासाठी पाणी पुरेसे क्षमतेने मिळत नाही.शेतकऱ्यांनी भाताच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी अर्ज निवेदने दिली आहेत आणि दरवर्षी मागणी देखील करीत असतात. पाटबंधारे खात्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा आगाऊ बैठका घ्यायला हव्यात आणि किती शेतकऱ्यांना दुबार शेतीसाठी पाणी हवे आहे याची चाचपणी करावी अशी मागणी केली आहे. सध्या केवळ 25 टक्के भातशेती ओलिताखाली येईल एवढे पाणी पाटबंधारे विभाग सोडत आहे.

भाताच्या शेतीला आवश्यक असलेले पाणी मिळत नसल्याने भाताची शेती या भागातील शेतकरी करीत नाहीत. दुसरीकडे धरणाच्या जलाशयात साठणाऱ्या पाण्याची क्षमता गाळ साचल्याने कमी झाली आहे, त्यामुळे धरणातील गाळ प्रथम काढावा.

-दिनेश कालेकर
शेतकरी, बिरदोले

Exit mobile version