कृषीमंत्री कोकाटे पुन्हा बरळले

सरकारमध्ये राहून सरकारचीच काढली लाज

| मुंबई | प्रतिनिधी |

कृषीमंत्री माणिकराव कोकोटे सभागृहात रमी खेळत असल्याचा कथित व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच आता महाराष्ट्र शासन भिकारी असल्याचे म्हटल्याने टीकेचे लक्ष्य झाले आहेत. पीक विम्यासंदर्भात केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांची गल्लत झाली आणि महाराष्ट्र शासन भिकारी असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं. शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. म्हणजे, भिकारी शासन आहे, तर शेतकरी नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांनी कोकाटेंनी केलेले विधान चुकीचे असून, नाराजी व्यक्त केली आहे. तर, विरोधकांनीही कोकाटेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावल्यानंतर कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मी राज्यातील शेतकऱ्यांना भिकारी असल्याचे म्हणालो नव्हतो, तर महाराष्ट्राचे सरकारच भिकारी असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा वादंग उठले आहे.

यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या एक रुपयात पीक विमा संदर्भात देखील आपण केलेल्या वक्तव्यावरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी मी शेतकऱ्यांना भिकारी म्हणालो नव्हतो, असे सांगितले. वास्तविक, शेतकरी नाही तर शासनच भिकारी असल्याचे म्हटले आहे. शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेता. त्याचा अर्थ शासन भिकारी आहे, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नाही तर, त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चाताप व्यक्त करुन राजीनाम देतील, अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच भिकारी म्हणून कळस गाठला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्यावे.

खा. सुप्रिया सुळे

ते काय बोलले हे एकलं नाही, पण तसं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी अस वक्तव्य करणे चुकीच आहे. पीक विम्याच्या संदर्भात जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी बहुतांश वर्षामध्ये कंपन्यांना फायदा जास्त झाला. त्यामुळे आपण त्याची पद्धत बदलली. त्यांचबरोबर 5 हजार कोटी रूपये दरवर्षी शेतीमध्ये गुंतवणूक करू. 25 हजार कोटी रूपयांची शेतीमधील गुंतवणूक वाढवत आहोत, असे असताना अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही.

देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री

माणिकराव कोकाटे आज खूपच पुढे गेलेत. राज्य शासन भिकारी आहे, हे ते म्हणालेत. मग भिकाऱ्यांच्या नेत्यांकडे 50-50 कोटी कुठून येतात? हे कळालं पाहिजे. कोकाटे यांनी वारंवार शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आम्ही तुम्हाला कर्ज देतो, त्या कर्जात तुम्ही मुलींची लग्न करता, असं कोकाटे म्हणाले होते. अशी माणसे त्या मंत्रीपदावर बसणं योग्य नाही.

खा. अरविंद सावंत,
शिवसेना ठाकरे गट

Exit mobile version