| पनवेल | प्रतिनिधी |
तालुक्यातील नैना प्रकल्प आणि वाढीव गावठाणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला असल्याचे विधान मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी गुरुवारी (दि. 7) पनवेल येथे बोलताना केले होते. खा. बारणे यांनी केलेल्या या विधानावर नैना प्रकल्पग्रस्त शेतकर्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खा. बारणे प्रकल्पग्रस्तांना चुचकरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात प्रकल्पबाधित गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नैना प्रकल्प व्हावा या मागणीसाठी 2013 पासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकर्यांनी आता प्रयत्न गाव बंद आंदोलन, मोर्चे, उपोषण या माध्यमातून प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. खा. श्रीरंग अप्पा बारणे मागील दोन टर्म खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, शेतकर्यांनी आतापर्यंत केलेल्या कोणत्याही आंदोलनाची दखल खासदार बारणे यांच्याकडून घेतली गेलेली नसताना पनवेल येथे खासदार बारणे यांनी केलेलं विधान निवडणुका तोंडासमोर ठेवून केले असल्याचा आरोप नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांनी केला आहे. नैना प्रकल्पग्रस्तांकरिता खासदार बारणे यांनी प्रयत्न केले असतील तर ती चांगली बाब आहे. पण, निवडणुकीच्या तोंडावर खासदार बारणे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे मागील दहा वर्षे खासदार म्हणून नैना प्रकल्पग्रस्तांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस राजेश केणी यांनी व्यक्त केले आहे.





