अहमद शेहजादने केली पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या हालचाली झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेतृत्वबदलापासून ते प्रशिक्षक बदलापर्यंत अनेक बदल झाले. वर्ल्ड कप 2023 मध्ये उपांत्य फेरीत पाकिस्तानला पोहचता न आल्याने कर्णधार बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

त्यानंतर त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारातील नेतृत्वपदाचा राजीनामा दिला. यानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद पाकिस्तानने वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडे सोपवले, मात्र त्याच्या नेतृत्वातील निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा एकदा टी-20 संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे देण्यात आले. त्यामुळे आता सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता याबद्दलच पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शेहजादने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली. महत्त्वाचे म्हणजे तो ही टीका करत असताना त्याचे माजी क्रिकेटपटू इमाम-उल-हकबरोबर बाचाबाचीही झाली. जिओ टीव्हीवर टी वर्ल्ड कपच्या तयारीबद्दलच्या शोमध्ये शेहजाद आणि इमाम यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शेहजाद म्हणाला, फबाबर आझमबद्दल बोलायचे झाले, तर दोस्ती-यारीची बात आहे. तो काही खेळाडूंना बर्‍याच काळापासून पाठीशी घालत आहे. ते खेळाडू फॉर्ममध्येही नाहीत, हे चांगले वाटत नाहीये. मी जर सामने मोजले, तर तुम्हाला समजेल की खेळाडूंना इतक्या संधी मिळत नाहीत. जर दुसरा कर्णधार असता आणि तो इतका काळ खेळाडूंना पाठीशी घालत असेल, तर त्याला ते समजले असते. क्रिकेट आपण फक्त द्विपक्षीय मालिका जिंकण्यासाठी नाही खेळत, तर आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी खेळतो.

आपण गेल्या चार-पाच वर्षात कोणती स्पर्धा जिंकली आहे का? जर नाही, तर मी म्हणेल की ही गँग आहे, मैत्री आहे, एक अशी टोळी जी क्रिकेटला चार-पाच वर्षांपासून मॅनिप्युलेट करत आहे. तसेच 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत पाकिस्तानने विजेतेपद मिळवल्याबद्दल शेहजाद म्हणाला,फसर्फराज अहमद आणि त्याच्या संघाने ते विजेतेपद मिळवले होते. त्याच्या नेतृत्वात आपण जिंकलो होतो. तुम्ही तुमच्या नेतृत्वात टी वर्ल्ड कप जिंका आणि सिद्ध करा. तुम्हाला बराच वेळ मिळाला आहे. एका कर्णधाराला पाच मोठ्या स्पर्धा नेतृत्वासाठी मिळत नाहीत. तुम्हाला नेतृत्वावरून आधी दूर केले आणि मग परत आणले. मी समजू शकतो, जर तुम्ही एमएस धोनी असाल आणि तुम्हाला परत आणले आहे, पण शाहिनबाबत हे चूकीचे झाले आहे. त्याला तुम्ही दोन सामन्यासाठी कर्णधार केले आणि काढून टाकले.

Exit mobile version