| चेन्नई | वृत्तसंस्था |
दक्षिण भारतात आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला जबर धक्का बसला आहे. एनडीए आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक या मित्रपक्षाने भाजपसोबत युती तोडल्याची घोषणा केली. सोमवारी झालेल्या बैठकीत अण्णाद्रमुकने अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडण्याच्या आणि भाजपसोबतची आघाडी मोडीत काढत असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाचे उप समन्वयक के पी मुनुसामी यांनी म्हटले की, आजपासून अण्णाद्रमुकने भाजप आणि एनडीए सोबतचे सगळे संबंध तोडत आहोत. भाजपचे राज्य नेतृत्व मागील वर्षभरापासून आमचे पक्षाचे महासचिव ईपीएस पलानीस्वामी, इतर नेत्यांसह कार्यकर्त्यांवरदेखील अनावश्यक टीका-टिप्पणी करत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत भाजपसोबत युती तोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले.दरम्यान, अण्णाद्रमुकने युती तोडत असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.