| नागोठणे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागोठणे व परिसरातील अनेक भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना रिलायन्स फाऊंडेशनने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने व्यापक मदत मोहीम राबविली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणेचे अध्यक्ष शशांक गोयल तसेच जनसंपर्क व शासकीय समन्वय विभागाचे प्रमुख अनिल डांगी यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग, नागोठणे-रोहा मार्ग, नागोठणे-पेझारी मार्ग तसेच नागोठणे आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील प्रभावित नागरिकांना मदतीचा हात देत पिण्याचे पाणी, अन्नपाकिटे आणि अत्यावश्यक मदत साहित्याचे वितरण करण्यात आले. जवळपास 8 हजार पॅकेजबंद पाण्याच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. मदतकार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी चार स्वतंत्र वाहनांची नियुक्ती करण्यात आली होती. 100 हून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक, क्षेत्रीय कार्यकर्ते आणि विविध विभागांतील प्रतिनिधींनी आठवडाभर दिवस-रात्र कार्य करून मदतकार्यात सहभाग नोंदविला.







