। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
नुकतेच अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातात विमानातील 241 प्रवासी मृत पावले. अशातच पुन्हा एकदा अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.17) लंडनसाठी केले जाणारे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानात सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया AI-159 या विमानात तांत्रिक बिघाड दिसून आला. मंगळवारी हे विमान नुकतेच दिल्लीहून अहमदाबाद विमान तळावर दाखल झाले होते. काही तासांतच हे विमान लंडनसाठी उड्डाण भरणार होते. मात्र, त्यापूर्वी झालेल्या तपासणीत तांत्रिक बिघाड दिसून आला आहे. त्यामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, सोमवारीही एअर इंडियाच्या AI-2493 एअरबस A321-211 (VT-PPL) या विमानात तांत्रिक बिघाड दिसून आला होता. त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला होता. तसेच, उड्डाणही रद्द करण्यात आले होते. हे विमान अहमदाबादहून मुंबईहून जाणार जाणार होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड दिसून येते असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या सलग तांत्रिक बिघाडांमुळे एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांमुळे कंपनीवर टीका होत आहे. एअर इंडियाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे; परंतु, वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांचा विश्वास डळमळीत झाला आहे.







