। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सुमारे सात दशकांनंतर महाराजाची टाटा समूहाकडे घरवापसी झाली़ एअर इंडियाची मालकी गुरुवारी पुन्हा मिळवताच टाटा समूहाने या कंपनीला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला़ एअर इंडियाच्या खरेदीसाठी स्पाईस जेटच्या प्रवर्तकांनी 12,906 कोटी रुपयांची बोली लावली होती़ मात्र, सर्व मालमत्ता आणि कंपनीवर असलेल्या सुमारे 15 हजार 300 कोटींच्या कर्जासह टाटा सन्सने लावलेली 18 हजार कोटी रुपयांची बोली जिंकली़ त्यातील 2700 कोटी रुपये रोख स्वरूपात देण्याचे ठरले होते़ त्यानुसार ही रक्कम प्राप्त झाली असून, एअर इंडियाचा निर्गुंतवणूक व्यवहार पूर्ण झाल्याचे अर्थमंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले़ एअर इंडियाच्या हस्तांतरणाबाबत टाटा सन्सचे अध्यक्ष एऩ चंद्रशेखरन यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली़ त्यानंतर चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आणि नव्या संचालक मंडळाची बैठक पार पडली़