जलप्रदूषणाच्या भीतीने केले वायूप्रदूषण

बालाजी हॉटेलच्या घनकचर्‍याला सावित्री नदीकिनारी भडाग्नी

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत लोहारे गावाच्या हद्दीमधील बालाजी हॉटेलच्या मागील भागातून मोठ्या आकाराचे धुराचे लोट आकाशाकडे झेपावत असल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिक पत्रकार आणि तहसील कार्यालयाच्या प्रशासनाला याबाबत महामार्गावरुन जाणार्‍या जागरूक नागरिकांनी कळविले. या हॉटेलच्या मागील बाजूला वाहणार्‍या सावित्री नदीपात्राच्या किनार्‍यावरील घनकचर्‍याचा डोंगर नदीपात्रात वाहून गेल्यास जलप्रदूषणाची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण डोंगराला प्रजासत्ताकदिनी भडाग्नी देण्यात आला असल्याचे पत्रकार आणि प्रशासनाच्या निदर्शनास आले. मात्र, यासंदर्भात लोहारे ग्रामपंचायत आणि पोलादपूर पंचायत समितीने सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील कारवाई करावयाची असल्याने यापुढील कारवाईकडे पोलादपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील बालाजी हॉटेलच्या मागील बाजूने शुक्रवारी दुपारच्या सुमारास धुराचे लोट आकाशात झेपावत असल्याचे दिसून आले. पोलादपूर एस.टी.स्थानकासमोरील रिक्षा व मिनीडोअर स्टँड असलेल्या पुलांवरून हे धुराचे लोट आकाशात जाताना पाहून अनेकांनी टँकर अथवा एखाद्या हॉटेलमध्ये आग लागल्याची शक्यता व्यक्त केली. याबद्दल काही स्थानिक समाजसेवी व्यक्ती व ग्रामस्थांनी पत्रकार आणि प्रशासनाला माहिती दिली. याठिकाणी पोहोचल्यानंतर तहसील कार्यालयाने आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता हॉटेलच्या मागील बाजूला जेवणासाठीच्या प्लास्टीक डिशेस आणि पाणी पिण्यासाठीच्या डिस्पोझेबल ग्लासेसचा डोंगराएवढा ढीग जाळला जात असल्याने काळ्या रंगाचे धुराचे लोट ढगासारखे आकाशामध्ये उसळत असल्याचे दिसून आले.

पोलादपूर तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रालगतच्या काही हॉटेल्समधून सांडपाणी आणि घनकचरा नदीपात्रामध्ये वाहून जाण्यासाठी जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत नदीकिनारी रचून ठेवला जात असल्याने अतिवृष्टी काळात नदीला पूर येऊन सर्व घनकचरा महाड एमआयडीसी आणि महाड शहराकडे वाहून जात असल्याची माहितीही यावेळी चर्चेत आली. यंदा पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांची बदली होऊन नवीन महिला गटविकास अधिकारी दिप्ती गाट या रूजू झाल्या असून, या बदलीचा गैरफायदा काही हॉटेलमालकांनी घेऊन पुर्वीप्रमाणे जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत सांडपाणी व घनकचरा नदीकिनारी रचून ठेवण्यास सुरूवात केली. पावसाळयानंतर गेल्या दीड दोन महिन्यांमध्ये सहलींच्या बसगाड्यांतून आलेले शाळकरी विद्यार्थी, लग्नसोहळे, पत्रकार अधिवेशन तसेच गेटटूगेदर यानिमित्ताने जेवण आणि पेयजलासाठी वापरण्यात आलेल्या डिस्पोझेबल डीशेस आणि ग्लासेसच्या घनकचर्‍याचा डोंगर नदीपात्रालगत घाणीचे साम्राज्य निर्माण करीत होता. यामुळे शुक्रवारी प्रजासत्ताकदिनी बालाजी हॉटेलच्या मागील भागातील नदीकिनारी हा घनकचर्‍याचा डोंगर जाळण्यात आल्यानंतर प्लास्टीकसदृश्य ज्वालाग्राही मटेरियलने काही क्षणात पेट घेऊन आकाशात काळया रंगाचे ढगासारखे धुराचे लोट पसरून अनेकांना खोकला, डोळे व छातीची जळजळ तसेच अनारोग्यकारक वातावरण निर्माण झाले.

आगीच्या ठिकाणी पोलादपूर तहसिल कार्यालयाने जीपीएस कॅमेर्‍याने फोटो काढून ठेवले आहे. मात्र, अलिकडील काळात कोणाचीही तक्रार लोहारे ग्रामपंचायतीकडे नसल्याने कारवाईसाठी ग्रामपंचायत आणि पोलादपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी महोदयांवर अवलंबून राहावे लागणार असून, गटविकास अधिकारी महोदया दिप्ती गाट या वैयक्तिक कारणांमुळे काही दिवसांपूर्वी रजेवर गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिणामी, पोलादपूर तहसिल कार्यालयाने याप्रकरणी गटविकास अधिकारी कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Exit mobile version