नवी मुंबईला वायू प्रदूषणाचा विळखा

नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 353 एक्युआय

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई शहरात मागील महिनाभरापासून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 ते 300 एक्युआयहुन अधिक निदर्शनास येत आहे. शुक्रवारी नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 353 असून राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. हवा गुणवत्तेत राज्यात मुबंईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आघाडीवर असून याठिकाणी सर्वाधिक 390 एक्युआय त्यांनतर नेरुळचा नंबर लागत आहे. त्यामुळे नवी मुंबईची दिवसागणिक वाढत जाणार्‍या या प्रदूषणाच्या विळख्यातुन सुटका कधी होणार? असा प्रश्‍न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


नवी मुंबई शहरात महानगरपालिकेच्यावतीने कंबर कसून स्वच्छतेत नवी मुंबई शहर अव्वल येण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. राहण्याजोग्या शहरात नवी मुंबईचा दुसरा क्रमांक लागत आहे. मात्र या नागरिकांच्या पसंतीस उतरणार्‍या शहराला दिवसेंदिवस प्रदूषणाचा विळखा आणखीन घट्ट होत चालला आहे. राज्यातील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या चंद्रपूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक देखील मुबंई नवी मुंबई पेक्षा कमी आहे. त्याठिकाणी कोळशापासून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असून हवेत मोठ्या प्रमाणावर धूर पहावयास मिळतो. तरीदेखील तेथील हवा गुणवत्ता मध्यम प्रकारात मोडत आहे. मात्र, नवी मुंबई आणि मुंबई मध्ये दिवसेंदिवस हवा गुणवत्ता ढासळत असल्याचे समोर येत आहे. एमआयडीसी मधील औद्योगिक कंपन्यांमधून सोडणारा वायू, शहरातील विकास कामे, रस्त्यावरील वाहने इत्यादी कारणामुळे शहरातील हवा गुणवत्ता खालावत आहे. शहरातील महापालिकेचे ऐरोली आणि नेरुळ से.19अ येथील हवा गुणवत्ता केंद्र बंद असल्याने याठिकाणीची हवा गुणवत्ता निदर्शनास येत नाही, तर महापे कोपरखैरणे येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 209 तर नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 353 एक्युआय आहे.

Exit mobile version