पालिकेकडून पाऊल उचलण्यास सुरुवात
। मुंबई । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये धुक्यांऐवजी दुषित हवा पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. परंतु, आता परिस्थिती चिंताजनक बनत चालली असून मुंबईची दुषित हवा आणि दिल्लीतील दुषित हवा यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मुंबईचा हवा निर्देशांक 104 इतका नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळे मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हवेतील गुणवत्ता सुधारणे हे मोठे आव्हान मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर आहे.
मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या उपनगरांधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्या मोगामाग आता नेरुळ, महापे, जुहू आणि छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ या परिसरातील हवेचा दर्जा सुद्धा खालावत चाललेला आहे. याबाबतची नोंदही हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबईचा सध्याचा हवेतील निर्देशांक हा 104 इतका नोंदविण्यात आला आला आहे. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि सातत्याने होणार्या हवामानातील बदलामुळे हवेतील गुणवत्तेचा दर्जा ढासाळत चालला आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु, यामुळे मुंबईकरांना श्वसनाचा आणि घशाचा आजार होऊ लागला आहे.