| कोल्हापूर | प्रतिनिधी |
कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची आंतरराष्ट्रीय टेनिसस्टार ऐश्वर्या जाधव हिने दिल्ली येथे झालेल्या 18 वर्षाखालील मुलींच्या फिनेस्टा राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तिने कर्नाटकची द्वितीय मानांकित राष्ट्रीय विजेती सुहिता मारुती हिचा तीन तासाहून अधिक काळ झालेल्या सामन्यात पराभव करीत ही स्वप्नवत कामगिरी केली.आर.के.खन्ना टेनिस स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या ऐश्वर्या (महाराष्ट्र) हिने पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली.
दुसऱ्या फेरीत अनन्या धनकर (हरियाणा) हिचा 6-1, 6-2 असा पराभव केला. तर उपउपांत्यपूर्व फेरीत तिने रिया सचदेव (दिल्ली) हिचा 6-3, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने माया रेवधी (तामिळनाडू ) हिचा 6-2, 6-3 असा पराभव केला. उपांत्य फेरीत तिने तामिळनाडूच्या हरितश्री व्यंकटेश हिचा पराभव केला. अंतिम फेरीत तिने तीन तास चाललेल्या या सामन्यात कर्नाटकच्या सुहिता मारुती हिचे कडवे आव्हान संपुष्टात आणले. ऐश्वर्याने तिच्यावर 6-3, 1-6, 6-3 अशी मात केली. ऐश्वर्याला मनाल देसाई, अर्षद देसाई यांचे मार्गदर्शन व जिल्हा टेनिस असोसिएशनचे चेअरमन दिलीप मोहिते, मुरलीधर घाटगे,उपाध्यक्ष डॉ.दिनेश कित्तूर, सचिव मेघन बागवडे आणि राज्य टेनिस असोसिएशनचे सहकार्य लाभले.