त्रिसदस्यीय समिती करणार सखोल चौकशी
। रेवदंडा । वार्ताहर ।
गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान धावणाऱ्या ‘अजंठा कॅटमरॉन’ प्रवासी बोटीला समुद्रात छिद्र पडल्याने तब्बल १३० प्रवाशांचे प्राण संकटात सापडले. शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर तत्काळ प्रतिक्रिया देत सागरी मंडळाने संबंधित बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना तसेच नोंदणी आणि सर्व्हे प्रमाणपत्र तातडीने निलंबित केले आहे. घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाच्यावतीने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती पुढील तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
कोण आहेत समितीत?
सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांनी समितीची घोषणा केली आहे. समितीचे अध्यक्षपद सागरी अभियंता व चीफ सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याकडे असेल. बांद्र्याचे प्रादेशिक बंदर अधिकारी सी. जे. लेपांडे सदस्य तर सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी कमांडंट संतोष नायर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कुठलीही तडजोड नाही
शुक्रवारी संध्याकाळी मांडवाच्या दिशेने निघालेल्या या बोटीला मांडवा जेट्टीपासून दीड किलोमीटर आधीच पाणी शिरू लागले. सुदैवाने दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने सर्व प्रवाशांना सुखरूप मांडवा जेट्टीवर पोहोचवण्यात आले. मात्र, या दुर्घटनेमुळे बोटींवरील देखरेख व सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बोटींची नोंदणी आणि तांत्रिक तपासणीसाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे निर्देशही नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, "हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.