ग्रामीण जनतेसाठी सुलभ तंत्रज्ञान
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
‘एकच मिशन तंत्रज्ञान मराठीमध्ये’ या ध्येयाने प्रेरित होऊन पालीतील व सध्या लंडनमध्ये कार्यरत असलेले संगणक तज्ज्ञ मिलिंद तुरे यांनी आता मराठीतून संवाद साधता येणारा ई-शोध हा एआय चॅटबॉट बनविला आहे. विशेष म्हणजे त्याला मराठी मधूनच बोललेले कळते आणि तोदेखील मराठी मधूनच उत्तरे देतो. याचा फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आणि वृद्धांना अधिक होणार आहे.
लंडनमध्ये सर्वत्र एआयचा वापर होताना पाहिल्यावर भारतीयांसाठी काहीतरी उपयुक्त करावे, असे मिलिंद तुरे यांना वाटले. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी मराठीतून सोल्यूशन असावे, हा विचार त्यांच्या मनांत आला. मिलिंद यांनी सांगितले की, माझे वडील म्हणाले की, सगळं इंग्रजीत उपलब्ध आहे; परंतु, ते वापरताना अडचण येते. त्यानंतर मनांत एक कल्पना आली, जर हेच आपल्या भाषेत उपलब्ध असेल तर किती सोपं जाईल. चीनने ‘डीपसिक’ सारखा एआय विकसित केला आहे. जो चॅटजीपीटी पेक्षाही सक्षम आहे. त्याचप्रमाणे, जर मराठीतून सहजसुलभ एआय असेल, तर सामान्य लोकांना तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल. म्हणून ‘डीपसिक’च्या सक्षम मॉडेलला मराठी भाषेसोबत जोडून, हा प्रयोग सुरू केला आहे. आणि ‘ई-शोध’ हा चॅट बॉट तयार केला असल्याचे मिलिंद यांच्याकडून सांगण्यात आले.
सर्वकाही मराठीत
हा बॉट डीपसीकच्या शक्तिशाली एआय मॉडेलवर आधारित आहे. तो बॉट फक्त मराठीत संवाद साधतो. सध्या इतर कोणत्याही भाषेतून याला सेट करावे लागत नाही. तो स्वतःच मराठीत विचारतो आणि मराठीतच उत्तर देतो. अशा प्रकारचा मराठी-केंद्रित बॉट आत्तापर्यंत उपलब्ध नव्हता.
हा चॅट बॉट सर्व मराठी भाषकांसाठी उपयुक्त आहे. विशेषतः वयस्कर व्यक्ती ज्यांना इंग्रजीतून तंत्रज्ञान वापरणे अवघड वाटते त्यांना तर अधिक उपयुक्त आहे. माझी आई याचा वापर स्वयंपाकाच्या पाककृती व घरगुती उपचारांसाठी करते. वडील शेगावला जाण्यासाठी 3 दिवसीय ट्रिप प्लॅन करतात. जर केवळ हे दोघेही माझ्या या प्रयत्नांमुळे सुखावले, तर इतरही लोक नक्की सुखावतील. त्यामुळे माझे सर्व परिश्रम सफल झाल्याचे समजतो.
– मिलिंद तुरे, संगणक तज्ज्ञ