आमदार आशिष शेलार गटाचे संजय नाईक पराभूत
| मुंबई | वृत्तसंस्था |
क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली. आशिष शेलारांनी पाठिंबा दिलेल्या संजय नाईक यांचा अजिंक्य नाईक यांनी 107 मतांनी पराभव केला आणि अध्यक्षपदावर आपली मोहर उमटवली. विशेष म्हणजे अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे मुबंई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यामुळे अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यामध्ये थेट लढत झाली.
या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना 221 मतांनी दणदणीत विजय मिळवला. संजय नाईक यांना 114 मते मिळाली. एकूण 375 पैकी 335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी झाल्यानंतर अजिंक्य नाईक यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निकालानंतर आता अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा 221-114 अशा मतांच्या फरकाने पराभव केला. संजय नाईक यांच्या पराभवामुळे आता आशिष शेलार यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार अशी चर्चा होती. अशातच सर्वांची धाकधूक वाढवणाऱ्या या लढतीमध्ये अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवला आहे.
मतदान कोण करतं?
मुंबईत एकूण 329 क्रिकेट क्बल असून या क्लबचे प्रतिनिधित्व मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आहे. या 329 क्लबचा प्रत्येकी एक सदस्य निवडणुकीत मतदन करतो. या शिवाय मुंबईतल्या राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या 40 खेळाडूंनाही मतदानाचा हक्क असतो. म्हणजे एकूण 369 मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार पॅनेलचे 11 सदस्य निवडून आले होते.
