अजितदादाची शेतकर्यांसमोर कबुली
। येवला । प्रतिनिधी ।
लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागला आहे. कंबर मोडायची वेळ आहे. चूक झाली माफ करा. जो काम करतो तोच चुकतो. अब की बार 400 पारमुळे देखील झटका लागला आहे, अशी कबुली अजित पवार यांनी दिली. अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा आज येवल्यात पार पडली. यावेळी अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी गुरुवारी (दि. 8) नाशिकमधून ही यात्रा सुरू केली होती. शुक्रवारच्या कार्यक्रमात त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला आणि लोकसभा निवडणुकीतील निकालावर खंत व्यक्त केली.
कांदा निर्यात आणि व्यापार्यांचे मुद्दे-कांदा निर्यातीबाबत ते म्हणाले, आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, यावर सरकारचं एकमत झालं आहे. बांगलादेशात आपला कांदा जातो. तिकडे परिस्थिती बदलेल. त्यांनी व्यापार्यांना माल देताना आधी पैसे देण्याचे आवाहनही केले. महिलांचे सन्मान आणि लाडकी बहीण योजना-महिलांसाठी बोलताना अजित पवार म्हणाले, बरेच वर्ष आम्ही समाजात महिलांना मान सन्मान दिला. आरक्षण दिलं, पण सबलीकरण राहीलं. काल आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांच्या खात्यांची माहिती आमच्याकडे आली आहे. येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार. ही योजना बंद करण्यासाठी नाही, ती कायमस्वरुपी चालू राहणार आहे. काम करण्यासाठी आम्ही सत्तेत सामील असतो. मी उपमुख्यमंत्री नसतो तर नरहरी झिरवळ, सरोज आहीर, हिरामण खोसकर आणि छगन भुजबळ यांना विकासासाठी पैसे देऊ शकलो असतो का? असे सांगत लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची फक्त एक जागा निवडून आली याबाबत अजित पवारांनी खंत व्यक्त केली.






