। नाशिक । प्रतिनिधी ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले. त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. दुसर्या कोणाला दोष देण्यात अर्थ नाही, असा थेट हल्ला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर चढवला आहे. ओबीसींचा एल्गार पुन्हा पुकारणार, सभागृहासह रस्त्यावरही लढाई घेऊन जाऊ, असा निर्धार त्यांनी केला आहे. तयेच, योग्य वेळी विचारपूर्वक निर्णय घेईन, तेव्हा भक्कम साथ द्या, असे आवाहन त्यांनी ओबीसी बांधवांना केले आहे.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, मला जर आता राज्यसभेवर पाठवायचे होते, तर येवल्यातून उभे करायचेच नव्हते. माझा मंत्रिमंडळात समावेश असावा, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचाच होता. अजित पवार यांनी कोणाचेही ऐकले नाही, मला मंत्रिमंडळातून वगळले. इतर कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेता ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ अशी अवस्था माझी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, एकट्या ‘लाडकी बहिणी’मुळे महायुतीला बहुमत मिळाल्याचा काहींचा भ्रम आहे. छगन भुजबळ यांचे आता काही नाही, असे त्यांना वाटत असेल. परंतु, या यशात ओबीसींचा वाटा आहे. बहुमताने सरकार येवूनही अशी अवहेलना का, याचे शल्य असल्याचे भुजबळ म्हणाले.