वारकरी पुन्हा विठ्ठल भेटीला..

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी दादागटाचे घालीन लोटांगण

| मुंबई | प्रतिनिधी |

विधिमंडळातील अपात्रतेची कारवाई टाळावी यासाठी फुटीर अजितदादा गटाने सोमवारी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेत घालीन लोटांगण घातले. मात्र यावेळीही पवारांनी मौन बाळगत आपले पत्ते खुले केले नाहीत. यामुळे दादा गटाला सातत्याने शरद पवारांची मनधरणी करण्याची वेळ आल्याची टीका राजकीय वर्तुळातून केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी शिंदे-फडणीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच अपात्रतेची कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे याचिका करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनादेखील याबद्दलचे पत्र देण्यात आले. यानंतर आता नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवारांना गळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमचे नेते आजही तुम्हीच आहात तुम्ही आम्हाला समजून घ्या, ही सर्व आमदारांची भूमिका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारीही शरद पवारांची अजित पवार गटाने भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. सोमवारीही तसाच प्रकार घडल्याने दादागट आता कात्रीत सापडल्याचे बोलले जाते. जर अपात्रतेची कारवाई झाली तर अजित पवारांसह नऊ मंत्र्यांना त्यास सामोरे जावे लागेल. ते टाळण्यासाठी दादा गटा सातत्याने शरद पवारांच्या भेटीला जात आहे.

पेरण्या झाल्या का?
मनधरणी करणाऱ्या दादा गटांच्या आमदारांना पवारांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. उलट जे भेटायला आले त्यांना उपस्थित आमदारांना आपआपल्या भागात पेरण्या झाल्या का, याबाबत विचारणा केली.

Exit mobile version