रायगड लोकसभा तटकरेंकडेच; धैर्यशील पाटलांवर हात चोळण्याची वेळ?
| रायगड | आविष्कार देसाई |
भाजपा जिंकणार्याच जागा लढवणार असल्याने वाजवीपेक्षा अधिक मागू नका, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे आणि अजित पवार गटाला ठणकावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा 35, शिंदे गट 9 आणि अजित पवार गटाला 4 जागा मिळणार आहेत. बारामती, मावळ आणि रायगडची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रायगडमधून सुनील तटकरेच लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे भाजपाने गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेली टिवटिव आता बंद होणार आहे. असे असले तरी भाजपा युती धर्माचे पालन करुन तटकरेंना मदत करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
राज्यातील जागावाटपावरुन भाजपाने आता आपले असली रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्याच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर राज्यातील लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा झाली. त्यामध्ये शिंदे गटासह अजित पवार गटाने अधिकच्या जागेची मागणी केली. मात्र, शाह यांनी ती मागणी धुडाकवून टाकली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही किती जागा जिंकल्या होत्या, हे आता महत्त्वाचे नाही. इतिहासात न जाता आताच्या वस्तुस्थितीनुसार भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक जिंकणे सोपे आहे. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक मागू नका, याची भरपाई आगामी होऊ घातलल्या विधानसभा निवडणुकीत केली जाईल, असे शाह यांनी शिंदे आणि अजित पवार यांना सुनावल्याचे बोलले जाते. मात्र, भाजपावर विश्वास कसा काय ठेवायचा, असा मतप्रवाह शिंदे आणि अजित पवार गटातील काही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
काहीच दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शिंदे गटाला पाच टक्के, तर अजित पवार गटाला फक्त पाच टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपा कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही.
भाजपाचा कोणत्या जागांवर दावा
उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर भाजपा दावा सांगत आहे. गेल्यावेळी ही जागा शिवसनेचे गजानन किर्तीकर निवडून आले होते. येथे शिंदे गटातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्याचप्रमाणे हिंगोली, कोल्हापूर, पालघर, यवतमाळ-वाशिम या शिंदे गटाच्या जागा भाजपाला पाहिजे असल्याचे बोलले जाते.
शिंदे गटाला मिळणार्या जागा
दक्षिण मध्य मुंबईची जागा ही शिंदे गटाला मिळू शकेल. सध्या राहुल शेवाळे येथे प्रतिनिधीत्व करतात. कल्याणची जागादेखील शिंदे गटाला मिळणार आहे. सध्या येथून मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे. इंडिया आघाडीतून वर्षा गायकवाड अथवा अनिल देसाई हे येथून निवडणुक लढवू शकतात. त्याचप्रमाणे हातकणंकले, रामटेक, मावळ, नाशिक, बुलढाणा, शिर्डी या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाला काय मिळणार?
बारामतीच्या जागेसाठी अजित पवार आग्रही आहेत. या ठिकाणी इंडिया आघाडीच्या सुप्रिया सुळे यांना निवडणुकीत हरवण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आखाड्यात उतरवण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे, असे झाल्यास येथे नणंद-भावजय असा सामना रंगणार आहे.
शिरुरची जागादेखील पाहिजे आहे. या ठिकाणचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना हरवण्याचा विडा खुद्द अजित पवार यांनी उचलला आहे. याबाबत पवार यांनी जाहीर सभेत हे बोलून दाखवले आहे.
रायगड लोकसभेच्या जागादेखील अजित पवार गटाला पाहिजे आहे. येथील विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तटकरेंना टार्गेट करुन ही जागा आपल्या पदारात पाडून घेण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. यासाठी त्यांनी धैर्यशील पाटील यांच्या गुडघ्याला बाशिंगदेखील बांधले आहे.
रायगडची जागा भाजपाच्या हातून गेल्यात जमा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तटकरे उमेदवार असतील, तर भाजपा प्रामाणिकपणे काम करणार का, हा खरा प्रश्न आहे. भाजपाने काम केले नाही, तर तटकरेंसाठी विजय अजिबात सोपा नसून, इंडिया आघाडीच्या अनंत गीतेंसाठी तो सुकर असल्याचे मानले जाते.
रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी भाजपाने रान उठवले होते. आतापर्यंत झालेल्या सभेमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावणकुळे, आ. रवींद्र पाटील यांच्यासह स्वतः घोड्यावर बसलेले धैर्यशील पाटील यांनी यासाठी एक प्रकारे तटकरेंना उमेदवारी देऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात मोहीम सुरु केली होती. मात्र, शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रायगड लोकसभा अजित पवार गटातील तटकरे यांनाच मिळणार असल्याचे निश्चित मानले जाते आहे.