पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवारांनी कट रचला

शरद पवार यांच्या वकिलांचा आयोगासमोर आरोप

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

हा पक्षाच्या अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शुक्रवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगासमोर सध्या सुनावणी सुरु आहे. सुनावणीत शुक्रवारी शरद पवार गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अजित पवारांकडे पक्षात किंवा संघटनेत कुठलीही जबाबदारी नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पक्षाचे नेते होते, पण अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सत्ता हवी आहे, म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. दिल्लीत पार पडलेल्या आठव्या अधिवेशनाच्या दरम्यान शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड करताना प्रस्तावक म्हणून प्रफुल्ल पटेल होते. आता मात्र पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला ते बेकायदेशीर म्हणत आहेत, असे कामत म्हणाले.

अजित पवार यांच्या वतीने जेव्हा दुसरा गट स्थापन करण्यात आला, तेव्हा त्यांनी थेट आपले अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. अध्यक्षपदावर त्यांनी दावा करत स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केले, पण हे चुकीचे असून घटनेला धरून नाही. अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना कुठलीही निवडणूक पार पडलेली नाही. अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना नियम पाळले गेले नाहीत, असे कामत यांनी आयोगाच्या निर्दशनास आणले.

Exit mobile version