अल्कराझ विम्बल्डनचा बादशहा

जोकोविचचा पराभव करीत जिंकले दुसरे ग्रँडस्लॅम

| विम्बल्डन | वृत्तसंस्था |

आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविचला विम्बल्डनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 20 वर्षीय कार्लोस अल्कराझने जोकोविचचा पराभव करत दुसरे ग्रँड स्लॅम जिंकले. लंडनमध्ये रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराझने अनुभवी नोवाक जोकोविच याचा पराभव केला. पाच सेटपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात त्याने 1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळवला.

नोव्हाक जोकोविचचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हे वर्चस्व अखेर स्पेनचा 20 वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराझने संपुष्टात आणले. टेनिसचे भविष्य मानले जाणार्‍या अल्कराझने 2017 नंतर ऑल इंग्लंड क्लबच्या स्पर्धेत जोकोविचला नमवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आणि कारकीर्दीत पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. या विजयासह कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. गेल्या वर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणार्‍या अल्कराझला विम्बल्डनमध्येही अग्रमानांकन लाभले होते. मात्र, त्यानंतरही त्याने जोकोविचला नमवणे हा धक्कादायक निकाल मानला जात आहे.

वर्चस्वाला शह
जोकोविच गेल्या चार विम्बल्डन स्पर्धात विजेता ठरला होता. तसेच त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचेच पारडे जड मानले जात होते. त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी साधण्याची संधीही होती. मात्र, अल्कराझच्या उत्कृष्ट खेळामुळे जोकोविचची ही संधी हुकली.

अल्कराझविरुद्ध खेळणे आव्हानात्मक
“तू अप्रतिम सव्र्हिस केली आणि मोक्याच्या क्षणी गुण मिळवले. त्यामुळे तू हा सामना जिंकणे हा योग्यच निकाल आहे. तुझे अभिनंदन. मला लाल मातीच्या आणि हार्ड कोर्टवर तुझ्याविरुद्ध खेळताना आव्हान जाणवत होतेच. आता ग्रास कोर्टवरही तू चांगला खेळ करत आहेस,’’ अशा शब्दांत अंतिम लढतीनंतर जोकोविचने अल्कराझची स्तुती केली.

स्पेनचा तिसरा खेळाडू
कार्लोस अल्काराझ विम्बल्डन जिंकणारा स्पेनचा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी सेंटाना याने 1966 मध्ये आणि राफेल नडालने 2008, 2010 मध्ये विम्बल्डन जिंकलेय. 12 वर्षांनंतर स्पेनच्या खेळाडूने पुन्हा ही स्पर्धा जिंकली आहे.

Exit mobile version