| कोईम्बतूर | वृत्तसंस्था |
भारताच्या कसोटी संघात प्रवेश करण्यासाठीची चुरस असतानाच सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर या दोघांना बुची बाबू क्रिकेट स्पर्धेतील लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या संघाने 379 धावा फटकावल्यानंतर मुंबईची अवस्था दुसऱ्या दिवसअखेरीस 8 बाद 141 धावा अशी झाली. यावेळी श्रेयस अय्यर दोन धावांवर, तर सूर्यकुमार यादव 30 धावांवर बाद झाला.
मुंबई संघातील फलंदाजांना येथील खेळपट्टीवर चमक दाखवता आली नाही. दिव्यांश सक्सेना याने 61 धावांची खेळी साकारत थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मुशीर खान (16), श्रेयस अय्यर (2) यांच्याकडून निराशा झाली. सूर्यकुमार यादव याने तीन चौकार व एक षटकारासह 30 धावा केल्या, पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. तसेच, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग व रॉयस्टन डियास यांनाही अपयश आले. सर्फराझ खान याला दुखापतीमुळे बुधवारी फलंदाजी करता आली नाही. याचा फटकाही मुंबईला बसला. तमिळनाडू संघाकडून लक्ष्य जैन व साई किशोर यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.
याआधी तमिळनाडू संघाने 379 धावा फटकावल्या होत्या. यावेळी प्रदोश पॉल याने 65 धावांची, इंद्रजीत बी. याने 61 धावांची तर भूपतीकुमार याने 82 धावांची खेळी साकारली. या तीन खेळाडूंच्या अर्धशतकांमुळे तमिळनाडू संघाला साडेतीनशेच्यावर मजर मारता आली.