। रत्नागिरी । वार्ताहर ।
मार्लेश्वर देवस्थान येथील दत्तगुरू मठात भाविक अडकल्याचा मेसेज संगमेश्वर तालुक्यातील शासकीय यंत्रणेला मिळाला अन् या भाविकांना वाचवण्यासाठी रविवारी मध्यरात्री पोलिस व आपत्कालीन यंत्रणा थेट मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पोहोचली. या भाविकांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सर्वच हवालदिल झाले होते. सोमवारी सकाळी हे भाविक सुखरूप असल्याचा संदेश शासकीय यंत्रणेला मिळाल्याने सुटकेचा निःश्वास टाकता; मात्र या घटनेमुळे शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती.
गगननिरी महाराजांचे शिष्य पवनगिरी चव्हाण यांनी हा मठ उभारला असून, ते 40 वर्षे वास्तव्याला होते. वयोमानामुळे ते कोल्हापूर येथे वास्तव्याला असतात; मात्र या ठिकाणी श्रावण, दसरा, महाशिवरात्र, मकर संक्रांतीला येतात. गुरुवारी पवनगिरी चव्हाण महाराज व अन्य सात भाविक या मठामध्ये गेले होते. हा दत्तमठ नदीच्या पलीकडे आहे. पवनगिरी चव्हाण महाराज व भाविक ज्यावेळी मठात गेले त्यावेळी पाऊस नव्हता, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे त्यांना नदीपार करून येणे शक्य झाले नाही.
रविवारी रात्री चव्हाण यांचे पुणे येथील शिंदे नामक शिष्य यांनी कोकण आयुक्तांना संपर्क करून मार्लेश्वर येथील दत्तगुरू मठात गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याचे सूचित केले. यानंतर मात्र सर्व शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. सुरुवातीला भाविकांकडून प्रतिसाद नव्हता. यंत्रणेचे अधिकारी सोमवारी सकाळी पुन्हा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री गेल्याने हे भाविक सुखरूप असल्याचे समजले. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत नदी ओलांडून येऊ नका, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या, त्यांना आवश्यक साधनसामुग्री सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील देवदास सावंत यांनी दिली.