चंदू बोर्डे
शेन वॉर्न हा जागतिक क्रिकेटमधल्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक. लेग स्पीनच्या या बादशहाचं वर्णन करताना शब्दही थिटे पडतील. त्याने भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. नव्वदीचं दशक हे शेन वॉर्नचं होतं. शेन वॉर्नचं असं अकाली निघून जाणं धक्का देणारं आहे. जागतिक क्रिकेटमधला एक जादूगार, किमयागार आपल्याला सोडून गेला आहे. त्याच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
शेन वॉर्न… ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज. जागतिक क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक. त्याने लेग स्पीन गोलंजादी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवलेले एक हजाराहून अधिक बळी त्याच्या महानतेची साक्ष देतात. शेन वॉर्नच्या नावावर कसोटीत 708 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 293 बळी आहेत. त्याचा कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक बळींचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 3 डिसेंबर 2007 या दिवशी मोडला. नव्वदीच्या दशकात शेन वॉर्न या नावाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचंड दहशत होती. वॉर्नने आपल्या फिरकीच्या तालावर भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यादरम्यान सचिन तेंडुलकर आाणि शेन वॉर्न यांची मैदानातली जुंगलबंदी चांगलीच रंगल्याचं पहायला मिळालं. वॉर्नने आपल्या फिरकीच्या बळावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. जलदगती गोलंदाजी ही मुख्य ताकद असणार्या ऑस्ट्रेलियन संघात त्याने आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. त्याने जागतिक क्रिकेटला भरभरून दिलं आहे. क्रिकेटमधलं त्याचं योगदान खूपच मोठं आहे. तो एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाज होताच शिवाय एक फलंदाज म्हणूनही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. शेन हा ऑस्ट्रेलियाचा खालच्या फळीतला उपयुक्त फलंदाजही होता. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3154 धावा केल्या, कसोटी कारकिर्दीत 12 अर्धशतकं झळकावली. कसोटी क्रिकेटमधली त्याची सर्वाधिक धावसंख्या 99. अवघ्या एका धावेने त्याचं शतक हुकलं होतं. कसोटीमध्ये शतक झळकावता न आल्याचं शल्य त्याने नेहमीच बोलून दाखवलं. अर्थात फलंदाज म्हणून शतक झळकावता आलं नसलं तरी गोलंदाज म्हणून त्याने विक्रमांचे इमले बांधले.
वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटीत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात त्याला फारसं यश मिळू शकलं नाही. भारताविरुद्धच्या या मालिकेत वॉर्नच्या हाती फारसं काही लागलं नाही. सुरूवातीच्या कसोटी मालिकांमधल्या अपयशानंतर वेस्ट इंजिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याला सूर गवसला आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. शेन वॉर्न टणक किंवा बर्फाच्या खेळपट्टीवरही चेंडू वळवू शकतो, असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलंं जायचं. अर्थात वॉर्नने हे अनेकदा सिद्धही करून दाखवलं. 1993 ची ऍशेस मालिका शेन वॉर्नच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. सहा सामन्यांच्या या मालिकेत त्याने सर्वाधिक बळी मिळवून धमाल उडवून दिली होती. याच मालिकेत त्याने शतकातला सर्वोत्तम चेंडू म्हणजे ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकला. चार जून 1993 या दिवशी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने घेतलेला माईक गेटिंगचा बळी कोणीही विसरू शकणार नाही. शेन वॉर्नने टाकलेला चेंडू 180 अंशात वळला आणि माईक गेटिंगचा बचाव भेदून थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. शेन वॉर्नने टाकलेला हा चेंडू बघून अनेकांचे डोळे विस्फारले. त्याच्या या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हटलं गेलं. 1993 मध्ये शेन वॉर्नने एका वर्षात 71 कसोटी बळी मिळवले. हा एका फिरकी गोलंदाजाने एका वर्षात मिळवलेला सर्वाधिक बळींचा विक्रम ठरला होता. इथूनच त्याची कारकिर्द बहरत गेली, फुलत गेली. तो यशाच्या पायर्या चढत गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवनवी शिखरं पादाक्रांत करत गेला आणि कालांतराने जागतिक क्रिकेटमधला महान फिरकी गोलंदाज ठरला.
शेन वॉर्न हा नव्वदीच्या दशकातला सर्वोत्तम लेग स्पीन गोलंदाज होता, ही बाब कोणीही नाकारू शकणार नाही. त्याने गोलंदाजीतली विविधता जपली होती. त्याच्या भात्यात विविध प्रकारची अस्त्रं होती आणि याच अस्त्रांच्या बळावर तो मोठमोठ्या फलंदाजांना बेजार करायचा. शेन वॉर्नने कधीही टप्पा सोडला नाही. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केल्यामुळेच त्याला सातत्याने बळी मिळत गेले. सातत्यपूर्ण गोलंदाजी हे त्यााचं वैशिष्ट्य होतं. वॉर्नने फलंदाजांना नेहमीच जखडून ठेवलं. वॉर्न गोलंदाजीला आल्यावर फटकेबाजी करणं अनेक फलंदाजांना जमत नसे. त्याची गोलंदाजी बघणं ही क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असायची. ‘अप्रतिम’ या एकाच शब्दात त्याच्या गोलंदाजीचं वर्णन करता येईल. तो एक लढवय्या खेळाडू होता. अत्यंत हरहुन्नरी आणि हसतमुख असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. वॉर्नी, हॉलिवड्डू अशा काही टोपणनावांनी तो ओळखला जायचा. त्याच्या रुपात ऑस्ट्रेलियन क्रिकेटला एक वरदान लाभलं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची दहशत निर्माण करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं. या स्पर्धेत शेनने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेच्या उपांत्य तसंच अंतिम सामन्यात तो ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता.
मी स्वत: लेगस्पीन गोलंदाजी केली असल्यामुळे या पद्धतीची गोलंदाजी करणं किती अवघड असतं, याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच शेन वॉनर्ं हा अतिशय उत्तम दर्जाचा लेग स्पीन गोलंदाज होता, हे मी अधिकारवाणीने सांगू शकतो. त्याचं असं अचानक निघून जाणं धक्कादायक आहे. शेन हा अनोखा खेळाडू होता. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात त्याचं एक वेगळंच स्थान आहे. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्स संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्याने आपल्या संघाला आयपीएलचं पहिलंवाहिलं विजेतेपदही मिळवून दिलं. यानंतर पुढचे दोन हंगामही त्याने राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद भूषवलं. त्यावेळी तो आयपीएलमधला एकमेव परदेशी कर्णधार होता. अगदी कमी वयात तो जग सोडून गेला. त्याच्या निधनाने क्रिकेटविश्व शोकसागरात बुडालं. त्याच्यासारख्या खेळाडूच्या अकाली जाण्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शेन वॉर्नच्या रुपाने फिरकीचा जादूगार, एक किमयागार आपल्याला सोडून गेला आहे. शेन फिरकी गोलंदाजांसाठी नेहमीच आदर्श होता आणि यापुढेही राहील, यात तीळमात्रही शंका नाही.
शेन वॉर्न हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सार्वकालिन महान गोलंदाजांपैकी एक असला तरी अनेक वादविवादांमध्येही अडकला. मैदानावरील प्रभावी कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील चुकीच्या वर्तनामुळेही तो कायम चर्चेत राहीला. 1994 मधल्या श्रीलंका दौर्यादरम्यान भारतीय सट्टेबाजाला खेळपट्टी तसंच वातावरणाची माहिती पुरवल्याचं त्याने कबुल केलं होतं. 2003 च्या विश्वचषकादरम्यान शेन वॉर्न प्रतिबंधित अमली पदार्थ घेतल्याप्रकरणी दोषी आढळला होता. त्यामुळे त्याची या स्पर्धेतून गच्छंती करण्यात आली. इतकंच नाही, तर त्याच्यावर एक वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. शेन दारू आणि सिगारेटच्या आहारी गेला होता. 2007 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान सिगारेट ओढणार्या वॉर्नचं छायाचित्र काही तरुणांनी काढलं होतं. त्यानंतर त्याचा या तरुणांसोबत वादही झाला होता. त्याची काही अश्लिल छायाचित्रं छापण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यासोबतच काही महिलांनी त्याच्यावर अश्लिल संदेश पाठवल्याचा आरोपही केला होता. 2000 मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या घटनेनंतरही त्याच्यावर महिलांनी अशा पद्धतीचे आरोप केले. त्याची बर्याच महिलांसोबत प्रेमप्रकरणंही होती. सहकारी खेळाडू स्टीव वॉला त्याने स्वार्थी खेळाडू म्हणून संबोधलं होतं. तसंच आपल्या आत्मचरित्रात मायकल क्लार्कवर टीका केल्यामुळे वॉर्नने रिकी पाँटिंगवरही शरसंधान केलं होतं. अशा अनेक कारणांमुळे वॉर्न निवृत्तीनंतरही कायमच चर्चेत राहिला.