| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिल्ली येथील बॉम्बस्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये या निमित्ताने कडेकोट बंदोबस्तासह, तपासणी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी दोन दिवस सागरी सुरक्षा कवच अभियान रायगड पोलीसांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून संशयास्पद बोटींवरील हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच रस्ते, खाडी, नदी, समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर नजर ठेवण्याचे काम केले जाणार आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (दि.10) एका उभ्या असलेल्या गाडीमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला. रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. रायगड जिल्ह्याला भला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनारी असलेल्या बोटींसह व्यापारी बोटींची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी करून वेगवेगळ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे आहेत. या पैकी 17 सागरी पोलीस ठाणे आहेत. त्यात खाडी लगतचे नऊ व सागरी आठ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 130 लँडिग पॉईंटसह, नदी, नाले, समुद्रकिनारे तसेच संशयीत बोटी उतरण्याची शक्यता असलेल्या ठिकाणाची तपासणी व पाहणी करण्याचे काम रायगड पोलीसांमार्फत सुुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात काही संशयीत हालचाली दिसून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. सागरी सुरक्षेसह रस्त्याच्या मार्गावरील सुरक्षादेखील मजबूत ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. तसेच येत्या 19 नोव्हेंबर पासून जिल्ह्यामध्ये दोन दिवस सागरी सुरक्षा कवच अभियान सागरी सुरक्षा विभागाच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. किनाऱ्यांवरील संशयास्पद बोटीवर लक्ष ठेवण्याबरोबरच वेगवेगळ्या उपाययोजना या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रायगडमध्ये अलर्ट! दोन दिवस राबविणार सागरी सुरक्षा कवच
