अलिबाग नगरपालिकेच्या क्रीडा संकुलासाठी सव्वा दोन कोटींच्या निधीची प्रतिक्षा

तातडीने निधी उपलब्ध झाल्यास मार्चमध्ये होणार खुले; नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यालयाच्या ठिकाणी असणार्‍या अलिबाग नगरपालिका हद्दीत अद्ययावत असे स्व. नमिता क्रीडा संकुलाचे 90 टक्के काम पुर्ण होत आले असून उर्वरित 10 टक्के कामासाठी 2 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीची प्रतिक्षा असून सदर निधी तातडीने उपलब्ध झाल्यास नव्या वर्षात अलिबागकरांसाठी सदर क्रीडा संकुल खुले करुन नववर्षाची भेट देण्याचा मानस नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला. क्रीडा संकुलाची माहिती देण्यासाठी प्रशांत नाईक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, बांधकाम व वीज सभापती अजय झुंजारराव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग या संकल्पनेवर आधारित देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटकांना आकर्षित करेल असे शहर बनविण्याचे विकासात्मक कार्य आमच्या सर्व सहकार्‍यांच्या वतीने सदैव पहायला मिळते. शहरातील वाढते नागरीकरण आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरामध्ये अनेक चांगल्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव पुढाकार घेतल्याचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक म्हणाले. ज्यामध्ये खासकरून अलिबाग शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, रस्ते आणि आरोग्य या घटकांवर विशेष भर पालिकेच्या वतीने नेहमी देण्यात आला आहे. शहरातील मागासवर्गीय, अपंग तसेच महिला व बालके यांचे जीवनमान सुधारणे, शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करणे, समुद्रावर सुशोभीकरण, रायवाडी उद्यान यासारखे अभिनव संकल्प आपल्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आले आहेत.


अलिबाग शहराचे आकारमान फार छोटे असल्याने शहरामध्ये मोठी उद्याने निर्माण करताना अडचणी निर्माण होत असतात, परंतु स्वर्गीय नमिता नाईक यांच्या कार्यकाळात अलिबाग शहरामध्ये एक सुसज्ज अद्यावत स्वतःचे हक्काचे एक क्रीडासंकुल असावे याकरिता प्रयत्न करण्यात आले. जेथे लहान मुलांपासून तरुणांना, महिलांना आणि वरिष्ठ नागरिकांना देखील त्याचा लाभ घेता येईल हे आम्ही प्राधान्याने ठरविले आहे. यासाठी अलिबाग नगरपरिषदेमध्ये 28 जून 2016 रोजी यासंदर्भातील ठराव एकमताने मंजूर करून श्रीबाग मधील जागा या क्रीडासंकुलासाठी निश्‍चित करण्यात आली आणि लगेचच 18 जुलै 2016 रोजी भाऊसाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते जागेचे भूमिपूजन साली पार पडले. सदर क्रीडा संकुलाला स्व. नमिता नाईक यांचे नाव देण्यासाठी एकमताने ठराव मंजुर करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.


या क्रीडासंकुलाकरीता जिल्हा नगरोत्थान मधून 2.00 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता, परंतु सदर निधी काही तांत्रिक कारणामुळे परत गेला. ज्यामध्ये जिल्ह्यातील एकूण 15 कोटीपेक्षा अधिक निधी यावेळी परत गेला. त्यामुळे क्रीडासंकुलाच्या कामाला थोडा विलंब झाला. परंतु नगरपरिषदेच्या वतीने विशेष प्रयत्न हा निधी परत मिळविण्यासाठी करण्यात आला आणि त्यानंतर एक वर्षाने हा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाला आणि त्यातून येथील कामाला सुरुवात झाली. सदर क्रीडासंकुलाचे एकूण कामकाज 5.50 कोटीचे अपेक्षित असून आजवर नगरपरिषदेच्या वतीने स्वनिधीतून 1.38 कोटीची कामे या क्रीडा संकुलाची करण्यात आलेली आहेत. तसेच जिल्हा नगरोत्थानचे 2.00 कोटी तर नगरपरिषदेचा स्वनिधी 1.38 कोटी असा एकूण 3.38 कोटीचा निधी या कामासाठी आजवर प्राप्त झालेला असून सर्व रक्कम क्रीडासंकुलाच्या कामकाजाकरिता खर्च करण्यात आली आहे. ज्यामधून सदर क्रीडा संकुलामध्ये सुसज्ज असे बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक स्विमिंग पूल, आधुनिक योगा सेंटर, जिमखाना, स्वतंत्र व्यायामशाळा याची उभारणी करण्यात आलेली आहे. ज्यामुळे अलिबाग शहरातील सर्व नागरिकांना याचा लाभ होणार आहे. स्विमिंग पूलचे 80% कामकाज पूर्ण झालेले असून केवळ क्लोरीनेशन युनिटचे कामकाज बाकी आहे.


क्रीडा संकुलाच्या संपूर्ण उभारणीसाठी एकूण 5.50 कोटी खर्च अपेक्षित असून आजवर 3.38 कोटीचा निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे उर्वरित 2.20 कोटीचा निधीकरिता आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. सदर निधी प्राप्त झाल्यास उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून मार्च 2022 पूर्वी सदर क्रीडा संकुल शहरातील नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. या क्रीडा संकुलामुळे अलिबागच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडणार असून अलिबाग शहरातील नागरिकांना या क्रीडा संकुलामुळे खेळाच्या संस्कुतीला पुढे नेण्यासाठी मदत मिळेल असा विश्‍वास नगराध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केला. त्यामुळे मार्च 2022 पूर्वी हे क्रीडा संकुल अलिबाग शहरातील सर्व नागरिकांसाठी विधिवत उद्घाटन करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अलिबाग शहराचा अर्थसंकल्प लक्षात घेता येथील खर्च उत्पन्नापेक्षा अधिक आहे, येथील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. याकरिता शहराच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून त्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम आम्ही मात्र सातत्याने करीत आलेलो आहोत. शहरातील नागरिकांना उत्तम रस्ते, मुबलक आणि स्वच्छ पाणी तसेच उत्तम आणि सुंदर स्वच्छ शहर यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध असणार आहोत.

क्रीडासंकुलाची माहिती पुढीलप्रमाणे
क्रीडासंकुलाची जागा- अलिबाग नगरपरिषद हद्दीतील श्रीबाग क्षेत्रविकास योजना क्र. 2, स.न. 25, 26, 100 व 101
जागेचे एकूण क्षेत्रफळ- 2654.00 चौ.मी. (26.5 गुंठे) बांधकामाचे एकूण क्षेत्र- 1035.00 चौ.मी. (11140.64 चौ.फुट) प्रस्तावित बांधकाम खर्च 5.50 कोटी शासनाकडून प्राप्त निधी- 2.00 कोटी नगरपरिषद निधी 1.38 कोटी आवश्यक निधी 2.20 कोटी
एकूण निधी- 3.38 कोटी
एकूण खर्च 3.38 कोटी

Exit mobile version