। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग-रामराज-रोहा रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरु करण्याच्या मागणीसाठी शेकापक्षाच्या महिला आघाडीप्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मंगळवारी (दि.8) हल्लाबोल करण्यात आला. जर तातडीने हे रखडलेले काम सुरु करण्यात आले नाही, तर शेकापक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यावेळी देण्यात आला होता. शेकापची आक्रमक भुमिका पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी आजपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वस्तरातून शेकाप व महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे आभार मानण्यात आले.
अलिबाग-रामराज-रोहा या अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी मंजुरी मिळवून आणली. मात्र, राजकारण करीत सदर रस्त्याच्या कामाला तत्कालिन सेना-युती सरकारने सुरुवात करुन दिली नाही. शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी युवक संघटनेने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्या तडाख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता सुखदेवे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले होते. त्यानुसार काही दिवसातच सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.
मात्र काही दिवसांतच ते बंद पडले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने लक्षवेधी इशारा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. कसलेही जबाबदार उत्तर देऊ न शकणार्या या कर्मचार्यांना शेकापच्या नेत्यांनी खडेबोल सुनावत तातडीने वरिष्ठांना कार्यालयात बोलावण्याच्या सूचना केल्या. त्यावर मोबाईलवरुन कंत्राटदार आणि अभियंता डोंगरे यांच्यात संभाषण होऊन शिष्टमंडळाला लगेच काम सुरु करण्याचे आश्वासन देण्यात होते. त्यानूसार आजपासून कामाला सुरुवात झाली.